मुंबई, 6 सप्टेंबर (आ.प्र.) :
‘विविध देशांची संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जाेडणारी काही सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. या मूल्यांचा शाेध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढवणे आजची गरज आहे. केवळ आर्थिक सहकार्य नव्हे, तर मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवादातूनच अधिक समताेल, शांततामय आणि समृद्ध जगाची निर्मिती शक्य आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘ग्लाेबल इम्पॅक्ट फाेरम-2026’च्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बाेलत हाेते. यावेळी मुंबईतील ब्राझीलचे महावाणिज्यदूत जाेसे माैराे फाेनेस्का काेस्टा काैटाे, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेतिसाेव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किन ती, दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गेडियन लाबाने यांच्यासह भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांतील राजनैतिक प्रतिनिधी, उद्याेगपती, अभ्यासक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला.
संचालक जान्हवी पवार यांनी ग्लाेबल इम्पॅक्ट फाेरमच्या व्यापक उद्दिष्टांची माहिती दिली. इतिहास आणि लाेकजीवनाच्या समृद्ध परंपरेत संगीत, नृत्य, क्रीडा आणि उत्सव सांस्कृतिक अभिव्य्नतीची प्रभावी माध्यमे ठरली आहेत. भारत आणि ब्राझील या दाेन्ही देशांच्या सांस्कृतिक परंपरांत असलेल्या साम्यस्थळांचे आणि दृढ भागीदारीचे दर्शन घडवणारे दृक्श्राव्य सादरीकरण यावेळी दाखवण्यात आले.