डेक्कन ओडिसीचा नवा पर्यटन हंगाम सुरू एमटीडीसीकडून पर्यटकांचे उत्साहात स्वागत

    30-Sep-2026
Total Views |

Paryatan 
मुंबई, 29 सप्टेंबर (आ.प्र.) :
जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे डेक्कन ओडिसी या पंचताराकिंत पर्यटन रेल्वेला एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी विशेष भेट दिली. यंदाच्या पर्यटन हंगामातील डेक्कन ओडिसीच्या पहिल्या सफरीलाही प्रारंभ झाला. राज्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा देश, विदेशातील पर्यटकांपर्यंत पाेहाेचवणाऱ्या या पर्यटन महाेत्सवाला यंदा नवे स्वरूप देण्यात आले आहे. नव्या हंगामासाठी डेक्कन ओडिसीला आकर्षक बाह्य विनाइल आवरण देण्यात आले आहे.
 
रेल्वेतील विविध काेचना राज्यातील विविध प्रदेशांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भाैगाेलिक वारशाशी संबंधित नावे देण्यात आली आहेत. या नावांमागील इतिहास, संस्कृती, खाद्यपरंपरा, पर्यटनस्थळे आणि वैशिष्ट्यांची माहिती पर्यटकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी प्रत्येक काेचमध्ये क्यूआर काेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डब्यातील केबिनच्या किचेनवरही क्यूआर काेड देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान राज्याच्या पर्यटन वारशाची माहिती डिजिटल माध्यमातून मिळणार आहे. यंदाच्या हंगामातील पहिली सफर महाराष्ट्र स्प्लेंडर या प्रवास आराखड्यानुसार सुरू झाली. मुंबई, नाशिक, अजिंठा, वेरूळ, काेल्हापूर, गाेवा आणि सावंतवाडी या पर्यटनस्थळांचा या सफरीत समावेश आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाबराेबरच अध्यात्म, खाद्यसंस्कृती आणि काेकणातील पर्यटन अनुभव या प्रवासातून घेता येणार आहे. या हंगामातील पहिल्या सफरीत ब्रिटनमधील पर्यटकांचा माेठा सहभाग असून अमेरिका, जपान, कॅनडा आणि मलेशियन पर्यटकही सहभागी झाले आहेत.