व्हीलचेअरवर असूनसुद्धा केरळच्या मुलीचे यूपीएससीत यश

आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेरिन यांनी शारीरिक मर्यादांना स्वप्नांच्या आड येऊ दिले नाही

    03-Sep-2026
Total Views |

UPSC 
मुंबई, 2 सप्टेंबर (आ.प्र.) :
इच्छा तिथे मार्ग ही म्हण आपण अनेकदा ऐकताे, पण केरळच्या वायनाड जिल्ह्यातील कंबालक्कड गावच्या शेरिन शहाना टी.के. यांनी ही म्हण प्रत्यक्ष जगून दाखवली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या 2025 च्या केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षा निकालात 913 वा क्रमांक पटकावून शेरिन यांनी सिद्ध केले की, जर मनात जिद्द असेल तर शारीरिक अपंगत्व आणि परिस्थितीचे काेणतेही वादळ तुमचे स्वप्न हिरावून घेऊ शकत नाही.
व्हीलचेअरवर बसून त्यांनी मिळवलेले हे यश केवळ एक निकाल नसून, एका मुलीच्या अदम्य इच्छाशक्तीचा विजय आहे. शेरिन यांचे आयुष्य आव्हानांनी भरलेले राहिले आहे. त्यांच्या प्रवासात एकापाठाेपाठ एक अशी संकटे आली जी काेणत्याही सामान्य माणसाला ताेडून टाकतील. 2015 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले हाेते. कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने संपूर्ण कुटुंब आधीच मानसिक ध्न्नयात हाेते. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा भीषण अपघात झाला. कुटुंब या ध्न्नयातून सावरत असतानाच, शेरिन घराच्या छतावरून खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. परिणामी, त्यांच्या शरीराचा खालचा भाग आणि हात निकामी (पॅरालाईज्ड) झाले. त्यानंतर त्या दाेन वर्षे अंथरुणाला खिळून राहिल्या.
 
अपघातानंतर त्या सलग दाेन वर्षे केवळ अंथरुणावर हाेत्या. या अत्यंत कठीण काळात त्यांची आई आणि बहीण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. लहानपणापासूनच आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेरिन यांनी शारीरिक मर्यादांना आपल्या स्वप्नांच्या आड येऊ दिले नाही. अंथरुणावर खिळलेले असतानाच त्यांनी ऑनलाईन अभ्यास सुरू केला.
त्यांनी केवळ नेट परीक्षाच उत्तीर्ण केली नाही, तर कालिकत विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवीही मिळवली.
यूएन एन्व्हायर्नमेंट प्राेग्रामचे प्रमुख मुरली थुम्मरुकुडी यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या यूपीएससीच्या तयारीला अधिक बळ दिले. शेरिन यांनी व्हीलचेअरवर बसून, मल्याळम भाषेतून आणि लेखनिक (स्क्राइब) च्या मदतीने यूपीएससीची परीक्षा दिली.
शेरिन यांच्या संघर्षाची परिसीमा इथेच संपली नाही.
 
परीक्षा दिल्यानंतर त्यांचा पुन्हा एक भयानक कार अपघात झाला. या अपघाताचा फटका त्यांच्या मेंदूला बसला आणि त्यांनी आपली स्मरणशक्ती गमावली. त्या वाचण्या- लिहिण्याच्या स्थितीतही राहिल्या नाहीत. ज्यावेळी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला, त्यावेळी शेरिन या यशाचा आनंद साजरा करण्याच्या स्थितीत नव्हत्या, तर त्या रुग्णालयात उपचार घेत हाेत्या.
 
एका मुलाखतीत शेरिन यांनी सांगितले की, माणसाने स्वतःला आणि आपल्या परिस्थितीला स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे. आज शेरिन यांनी केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर जगाला दाखवून दिले की, परिस्थिती कितीही अंधारमय असली तरी तुमच्या आत्मविश्वासाचा एक लहानसा दिवा संपूर्ण आयुष्य उजळून टाकू शकताे. शेरिन शहाना यांचा हा प्रवास देशाेदेशीच्या काेट्यवधी तरुणांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल.