कुंभमेळ्यातील गर्दीवर राहणार एआय कॅमेऱ्यांची नजर

नाशिक-त्र्यंबकमध्ये ५ हजार कॅमेऱ्यांचे जाळे उभारणार

    24-Sep-2026
Total Views |
 
AICCTV
नाशिक, 23 सप्टेंबर (आ.प्र.) :
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले जात आहे. साधुग्राम, नवीन घाट आणि वाहनतळे आदी ठिकाणी सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रशासनाने नाशिकमध्ये एक हजार अतिर्नित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी नियाेजित कॅमेऱ्यांची एकूण संख्या पाच हजारांवर पाेहाेचणार आहे.
 
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात 12 काेटी भाविक सहभागी हाेण्याचा अंदाज आहे. गाेदाकाठावरील दाट वस्तीत कुंभमेळा भरत असल्याने गर्दीचे व्यवस्थापन हे यंत्रणांसमाेरील माेठे आव्हान आहे. त्यासाठी आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्राेनच्या मदतीने एकात्मिक सुरक्षा यंत्रणा उभारण्याचे नियाेजन आहे. यापूर्वी नाशिक शहरात तीन हजार, तर त्र्यंबकेश्वरमध्ये एक हजार अशा एकूण चार हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियाेजन करण्यात आले हाेते. त्यांचे कामही प्रगतिपथावर आहे. मात्र, पाेलीस प्रशासनाच्या सूचनेनंतर या प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला आहे. मूळ आराखड्यात साधुग्राम, नव्याने विकसित हाेणारे घाट आणि शहरातील वाहनतळांचा समावेश नव्हता. आता या ठिकाणांचाही प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या एक हजार कॅमेऱ्यांपैकी सुमारे 350 कॅमेरे तपाेवनातील साधुग्राममध्ये बसवले जातील.
 
देशभरातून दाखल हाेणारे साधू-महंत तेथे वास्तव्यास असतील. शहराच्या हद्दीतील वाहनतळांवर 250, तर गाेदावरी नदीकाठावरील नवीन घाटांवर सुमारे 400 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्हींचे जाळे गर्दी नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयु्नत शेखर सिंह यांनी सांगितले. कॅमेरे बसवण्याचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर सीसीटीव्ही चित्रण, ड्राेनद्वारे देखरेख, माहितीचे विश्लेषण आणि मध्यवर्ती कमांड सेंटरशी संलग्नता असे टप्पे पार पडतील. कुंभमेळ्यापूर्वी हे विशाल नेटवर्क कार्यान्वित हाेणार आहे. साधुग्राम, वाहनतळे आणि घाटांवरील एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे कुंभमेळा कालावधीसाठी तात्पुरते असतील. कुंभमेळ्यानंतर हे कॅमेरे पाेलिस यंत्रणेशी चर्चा करून शहरातील इतर ठिकाणी बसवण्यात येतील. त्यामुळे कुंभमेळ्यानंतरही नाशिक शहरात चार हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्यापक जाळे कायमस्वरूपी उपलब्ध हाेणार असल्याचे शेखर सिंह यांनी नमूद केले.