स्टेराॅइड हा शब्द ऐकताच सामान्यतः आपण घाबरताे, पण हजाराे वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी ग्रंथांमध्ये रसायन आणि ओजसच्या नावाने नैसर्गिक स्टेराॅइडल प्रभावांचा अप्रत्यक्ष उल्लेख केलाच आहे. आयुर्वेदात अशी काही औषधे आहेत जी नैसर्गिक स्टेराॅइडचे काम करतात. हे नैसर्गिक स्टेराॅइड्स कुठे असतात आणि आराेग्यासाठी ते कशा प्रकारे आवश्यक आहेत, ते जाणून घ्या. (भाग 1)
जर्नल ऑफ एथनाेफार्माकाेलाॅजी आणि भारतीय फार्माकाेव्हिजिलन्सच्या डेटानुसार, बाजारात मिळणाऱ्या बनावट किंवा अनधिकृत चमत्कारी लैंगिक आराेग्य, वजन वाढवणाऱ्या आणि संधिवाताच्या 15 ते 20 टक्के हर्बल उत्पादनांमध्ये गुपचूप सिंथेटिक स्टेराॅइड्स किंवा पेनकिलर्सची भेसळ आढळली आहे. जिममध्ये बाॅडी-बिल्डिंगसाठी लाेक स्टेराॅइड्सचा वापर करतात, हे सर्वांना माहित आहे. औषध म्हणून फुफ्फुसांच्या आजारात आणि तीव्र वेदनांमध्ये पेनकिलर म्हणूनही स्टेराॅइड्सचा वापर हाेताे.
मात्र, त्याच्या असंख्य साईड इफेक्ट्सवरही भरपूर संशाेधन झाले आहे. उदाहरणार्थ, अमेरिकन काॅलेज ऑफ रुमॅटाेलाॅजीच्या अहवालानुसार, जे रुग्ण काेणत्याही कारणास्तव 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ केमिकल स्टेराॅइड्स घेतात, त्यांच्यापैकी 30 ते 50 टक्के रुग्णांमध्ये हाडे फ्रॅक्चर हाेण्याचे किंवा ठिसूळ हाेण्याचे (ऑस्टिओपाेराेसिस) धाेका असाधारणपणे वाढताे. सिंथेटिक स्टेराॅइड्स सुरू केल्यानंतर काही आठवड्यांतच हाडे झिजण्याचे प्रमाण सर्वात जास्त असते. ब्रिटिश मेडिकल जर्नलमधील एका व्यापक क्लिनिकल स्टडीनुसार, दीर्घकाळ सिंथेटिक काॅर्टिकाेस्टेराॅइड्स घेणाऱ्या रुग्णांमध्ये टाईप-2 मधुमेह हाेण्याचा धाेका सामान्य माणसापेक्षा अडीचपट वाढताे, ज्याला स्टेराॅइड- इंड्युस्ड डायबिटीस म्हणतात. हृदयविकार आणि उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) हाेण्याची शक्यता चारपटीने वाढते. जागतिक आराेग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जेव्हा कृत्रिम स्टेराॅइड्स अचानक बंद केले जातात, तेव्हा शरीराची नैसर्गिक हार्माेन सिस्टीम ठप्प झाल्यामुळे अॅड्रेनलिन क्रायसिस उद्भवताे. रुग्णाचा रक्तदाब अचानक कमी हाेताे, तीव्र उलट्या-जुलाब हाेतात आणि कधीकधी रुग्ण काेमातही जाऊ शकताे.
स्टेराॅइड्स म्हणजे काय?
स्टेराॅइड्स हे चरबीवर आधारित आणि काेलेस्ट्राॅलपासून बनलेले रेणू आहेत, जे नैसर्गिकरित्या वनस्पतींमध्ये तसेच मानवांसह प्राण्यांमध्ये आढळतात. मानवी शरीरात ते मुख्यत्वे अॅड्रेनल ग्रंथी आणि प्रजनन अवयवांद्वारे निर्माण हाेतात. ते शरीरातील पचनक्रिया, रक्तदाब, राेगप्रतिकारशक्ती आणि स्नायूंचा विकास यांसारख्या महत्त्वाच्या कार्यांचे संचलन करतात. गमतीची गाेष्ट म्हणजे, हे स्टेराॅइड्स नैसर्गिकरित्याही मिळतात आणि ते प्रयाेगशाळेतही बनवता येतात. सूज कमी करण्यासाठी, पचनासाठी, रक्तदाब आणि पाण्याचे संतुलन राखण्यासाठी, तसेच स्त्री आणि पुरुष हार्माेन्सचे नियमन करण्यासाठी नैसर्गिक स्टेराॅइड्सची भूमिका असते. प्रयाेगशाळेत नैसर्गिक हार्माेन्सची नक्कल करून बनवलेले स्टेराॅइड्स दाेन प्रकारचे असतात. एक, जे सूज आणि लर्जी कमी करण्यासाठी दम्यासारख्या किंवा संधिवाताच्या आजारांत वापरले जातात आणि दुसरे, स्नायू वाढवण्यासाठी व ताकद देण्यासाठी वापरले जातात.