मुंबई, 17 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्यातील लाखाे महिला प्रवाशांची सुरक्षितता, आराेग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) टाेयाेटा किर्लाेस्कर माेटर प्रायव्हेट लिमिटेडसाेबत 125 हिरकणी कक्ष उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक उपस्थित हाेते. महिलांना, विशेषतः स्तनदा मातांना प्रवासादरम्यान आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. एसटी स्थानकांवर मातृत्वाला आवश्यक असलेली संवेदनशीलता आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या प्रकल्पासाठी टाेयाेटा किर्लाेस्कर कंपनी आपल्या काॅर्पाेरेट साेशल रिस्पाॅन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत सहकार्य करणार आहे. एसटी स्थानकांवर अंदाजे 3 मीटर बाय 3 मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. तीन आर्थिक वर्षांत एकूण 125 हिरकणी कक्ष उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सीएसआर धाेरण, उपलब्ध जागा आणि स्थानिक गरजेनुसार या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याची तरतूदही करारात करण्यात आली आहे.