सर्वांना विश्वासात घेऊनच ठाणे अंतर्गत मेट्रोचा निर्णय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : भागातही कळवा-मुंब्रा-दिवा मेट्रोचा विस्तार होणार

    06-Aug-2026
Total Views |

thanemetro 
ठाणे, 5 ऑगस्ट (आ.प्र.) :
ठाण्याच्या प्रस्तावित अंतर्गत मेट्राे प्रकल्पाला नागरिकांकडून हाेत असलेल्या विराेधाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या शंका, हरकती आणि भीती दूर करण्यासाठी जनसुनावणी घेण्याबराेबरच विविध भागांत नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. कळवा-मुंब्रा-दिवा भागापर्यंत मेट्राेचा विस्तार करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासह चेंदणी काेळीवाडा आणि जुन्या ठाणे परिसराचा स्वतंत्र परिणाम मूल्यांकन (इम्पॅक्ट असेसमेंट) अहवाल तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
 
मुंबईत सह्याद्री विश्रामगृहात याबाबत झालेल्या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक व माधवी नाईक आणि महामेट्राेचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित हाेते.
आमदार निरंजन डावखरे ऑनलाइन बैठकीला उपस्थित हाेते. नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय काेणताही विकास प्रकल्प राबवू नये, अशी भूमिका डावखरे यांनी मांडली. नागरिकांच्या हरकती, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी अधिकृत जनसुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. माधवी नाईक यांनीही जनसुनावणीची सूचना मांडली.
दाेन्ही आमदारांच्या मागणीला प्रतिसाद देत शिंदे यांनी जनसुनावणीस तत्त्वतः मान्यता दिली तसेच अंतर्गत मेट्राे मार्गावरील विविध भागांत परिसंवाद आयाेजित करून नागरिकांना प्रकल्पाची माहिती दिली जाणार आहे.
गणेशाेत्सवाच्या काळातही जनजागृतीसाठी माहिती फलक लावण्यात येणार आहेत. ठाणे अंतर्गत मेट्राे प्रकल्पाचे संपूर्ण भूसंपादन आणि इतर तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यास हा प्रकल्प अवघ्या साडेतीन वर्षांत पूर्ण करू, असा विश्वास हर्डीकर यांनी व्य्नत केला.