मुंबई, 12 ऑगस्ट (आ.प्र.) :
आजचा दिवस केवळ नवीन इलेक्ट्रिक ट्रकच्या लाँचचा नाही, तर देशाच्या हरित आणि शाश्वत वाहतूक क्रांतीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. बॅटरी व इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धाेरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाला हरित वाहतुकीची दिशा दाखवत आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
टाटा माेटर्सने 7 ते 55 टन क्षमतेच्या देशातील पहिल्या संपूर्ण बॅटरी इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे सादरीकरण केले. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन उद्याेगासाठी अनुकूल धाेरणात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्याच्या ईव्ही धाेरणामुळे वाहन उत्पादक, उद्याेग आणि वाहतूक क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध हाेत आहेत. पुण्यात भारतीय अभियंत्यांनी डिझाइन आणि विकसित केलेले हे इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांचे उत्तम उदाहरण आहे.
भारतीय काैशल्य, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता यांची ताकद या वाहनांमधून दिसून येते, असे सरनाईक यांनी सांगितले.
या इलेक्ट्रिक ट्रकची एका चार्जमध्ये सुमारे 350 किमीपर्यंतची रेंज, फास्ट चार्जिंगची सुविधा आणि कमी ऑपरेटिंग खर्च, ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. कमी वेळेत चार्जिंग पूर्ण झाल्याने ट्रक अधिक वेळ रस्त्यावर धावू शकताे आणि वाहतूकदारांची उत्पादकता वाढू शकते.
हा ट्रक केवळ पर्यावरणपूरक नाही, तर वाहतूकदार आणि चालकांसाठी अधिक फायदेशीर, विश्वासार्ह आणि किफायतशीर पर्याय ठरणार आहे. भविष्यातील व्यावसायिक वाहतुकीची दिशा आता स्पष्ट झाली आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. इलेक्ट्रिक माेबिलिटीमुळे केवळ वाहन उद्याेगातच नव्हे, तर बॅटरी तंत्रज्ञान, संशाेधन-विकास, उत्पादन, पायाभूत सुविधा आणि वाहन सेवा क्षेत्रात माेठ्या प्रमाणावर राेजगार व काैशल्य विकासाच्या संधी निर्माण हाेतील, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.