विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची मुख्य सचिवांकडून पाहणी

विकासकामांबाबत केली चर्चा

    13-Aug-2026
Total Views |
 
wari
पंढरपूर, 12 ऑगस्ट (आ.प्र.) :
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले; तसेच चंद्रभागा नदी घाट तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी त्यांचे स्वागत केले.
मुख्य सचिवांनी प्रथम घाट परिसराची पाहणी केली.
 
जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्र स्वच्छतेसह सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. आषाढी-कार्तिकी वारीतील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पायाभूत सुविधांत वाढ करण्याच्या उपाययाेजनांबाबत सूचना दिल्या. त्यानंतर मुख्य सचिवांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत 73 काेटींच्या निधीतून मंदिर विकास, सुशाेभीकरण कामांची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावित श्री क्षेत्र पंढरपूर काॅरिडाॅर प्रकल्पाबाबत माहिती दिली.
 
आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्ग, पंढरपूर शहर व परिसरातील गर्दी नियंत्रणासाठी व वाहतूक नियमासाठी पाेलीस प्रशासनाकडून वापरण्यात आलेल्या एआय तंत्रज्ञानाबाबतची माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
प्रस्तावित विकासकामे, भाविकांच्या सुविधा आणि परिसराच्या नियाेजनाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिवांनी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मुख्य सचिवांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्यातील शेतकरी व भाविकांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मुख्य सचिवांचा सत्कार करण्यात आला.