मुंबई, 12 ऑगस्ट (आ.प्र.) :
महाराष्ट्राला इनाेव्हेशन हब म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमाेरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सूचवण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘द गव्हर्नन्स चॅलेंज टीजीसी 2026’च्या चाैथ्या पर्वाची राज्य शासनाने घाेषणा केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देशातील राज्य शासन व्यवस्थेवर पहिली राष्ट्रीय प्रशासनकेंद्रित स्पर्धा म्हणून आयाेजिण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील प्रतिभावान युवा विद्यार्थ्यांना राज्याच्या भविष्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सूचविण्याची संधी मिळणार आहे. राज्य शासनाच्या पुढाकाराने आणि समग्र संस्थेच्या आयाेजनातून ही स्पर्धा हाेईल. देशातील 30 नामांकित बिझनेस आणि पब्लिक पाॅलिसी संस्थांमधील विद्यार्थी याच सहभागी हाेणार आहेत.
द गव्हर्नन्स चॅलेंज स्पर्धा दाेन महिन्यांच्या कालावधीत तीन टप्प्यांत हाेईल. सहभागी 30 संस्थांतील विद्यार्थी संघ आपले प्राेजेक्ट सादर करतील.
त्यांच्या मूल्यांकनानंतर प्रत्येक संस्थेतील एक विजेता संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरेल. एकूण सहा अंतिम संघांची निवड करण्यात येईल. हे संघ मुख्यमंत्र्यांसमाेर आपल्या शिफारसी सादर करतील. अंतिम संघांसाठी राज्यात दाेनदिवसीय विशेष गव्हर्नन्स इमर्शन व्हिजिट आयाेजिण्यात येणार असून, त्याद्वारे त्यांना शासन व्यवस्था आणि याेजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा अनुभव घेता येईल.