पुणे, 9 ऑगस्ट (आ.प्र.) :
विजेची कामे करताना कर्मचाऱ्यांना माेठी जाेखीम पत्करावी लागते. यासाठी महावितरण प्रशासनाने अत्याधुनिक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली असून, प्रत्येक कर्मचाऱ्याने या साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.
कर्मचारी हाच कंपनीचा खरा कणा असून, त्याच्या सुरक्षिततेची काळजी कंपनी आणि कुटुंबाला सारखीच आहे, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले.
गणेशखिंड येथील प्रकाशभवन सभागृहात पवार यांनी मानव संसाधन विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान पुणे परिमंडलातील वीज कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, विजयानंद काळे, सहायक महाव्यवस्थापक सत्यजित राजेशिर्के, उपमुख्य औद्याेगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे, समन्वयक डाॅ. संताेष पटणी यांच्यासह परिमंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, मानव संसाधन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. एखादे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी कितीही दबाव असला, तरी सुरक्षेच्या नियमांना कधीही बगल देऊ नका. वीज काेणालाच क्षमा करत नाही.
त्यामुळे प्रत्येक कामात सुरक्षा साधनांचा वापर आवश्यक आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन, उत्तम सुविधा आणि कल्याणकारी याेजना राबवून त्यांची काळजी घेते. याच भावनेतून कर्मचाऱ्यांनीही ग्राहकांची काळजी घ्यावी, असेही पवार यांनी सांगितले.
सुरक्षा हा राेजच्या जीवनात अविभाज्य भाग बनला पाहिजे आणि तशी कार्यसंस्कृती महावितरणमध्ये तयार करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. त्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी प्रत्येक आठवड्यात (साेमवारी) कामाची सुरुवात सुरक्षा प्रतिज्ञा घेऊनच करावी, असे निर्देश देण्यात आले असून, त्याची नाेंद ऑनलाईन प्रणालीत फाेटाेसह घेतली जात आहे, असे काकडे यांनीही सांगितले.