मुंबई, 26 जुलै (आ.प्र.) : ‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवून, कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करून आणि करदात्यांचा विश्वास संपादन करून स्वतःला जनस्नेही संस्थेत रूपांतरित केल्याबद्दल राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी प्राप्तिकर विभागाचे अभिनंदन केले. एकेकाळी भीतीदायक म्हणून ओळखला जाणारा प्राप्तिकर विभाग आज जनस्नेही मित्र बनला आहे,’ असे गाैरवाेद्गार राज्यपालांनी काढले.
राज्यपालांच्या उपस्थितीत प्राप्तिकर विभागाचा 167वा स्थापना दिवस विभागाच्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील काैटिल्य भवनात झाला. त्यावेळी ते बाेलत हाेते. मुंबई मेट्राे, काेस्टल राेड प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक; तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प करदात्यांच्या याेगदानाचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगून, या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था, संपर्क, आर्थिक विकास आणि भविष्यासाठी सक्षम शहर उभारण्यास माेठी चालना मिळत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. संकलित हाेणारा कर देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण याेगदान देत असल्याचे सांगून प्रत्येक करदात्याने आपली सामाजिक जबाबदारी समजून कर भरावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले.
मुंबईचे प्रधान मुख्य प्राप्तिकर आयु्नत आलाेक कुमार यांनी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची प्रक्रिया आता सुलभ झाल्याचे सांगितले. 2019 मध्ये प्राप्तिकर विवरणपत्रावर प्रक्रियेसाठी 82 दिवस लागत. आज ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण हाेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
परताव्याची (रिफंड) र्नकमही जलद दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात प्राप्तिकर विभाग सर्व शासकीय विभागांत आघाडीवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मुंबईचे याेगदान अनेक राज्यांपेक्षाही अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अभिनेते विकी काैशल यांनी प्राप्तिकर विभागाला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देत या समारंभात सहभागी हाेताना अभिमान वाटत असल्याची भावना व्य्नत केली.