कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलीला वगळणे चुकीचे : काेट

    13-Jul-2026
Total Views |
 
supreme-court-verdict-married-daughter-rights
 
संध्यानंद.काॅम (भाग 1) विवाहित मुलींना त्यांच्या मृत पालकांच्या हक्काच्या कल्याणकारी लाभांपासून वंचित ठेवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने दिला.

लग्नानंतर मुलगी आपल्या माहेरच्या कुटुंबाचा भाग राहत नाही, ही धारणा घटनात्मकदृष्ट्या अयाेग्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नाेंदवले.

न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलाेक आराधे यांच्या खंडपीठाने अमेठी येथील एका प्रकरणाची सुनावणी करताना हे निरीक्षण नाेंदवले. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील 2019च्या एका नियमाचा आधार घेत एका विवाहित मुलीला तिच्या मृत आईचे रास्त भाव दुकान (रेशनचे दुकान) चालवण्याची परवानगी नाकारण्यात आली हाेती. कारण या नियमात कुटुंब या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळण्यात आले हाेते.

ही तरतूद समानतेच्या घटनात्मक हमीशी विसंगत विवादास्पद तरतूद या गृहीतकावर आधारित आहे की विवाहानंतर मुलगी आपल्या पित्याच्या कुटुंबातील सदस्य किंवा त्यावर अवलंबून असलेली व्यक्ती राहत नाही. असे गृहीतक घटनात्मकदृष्ट्या अमान्य आहे.

ही तरतूद समानतेच्या घटनात्मक हमीशी विसंगत असून, ती लिंगअसमानतेच्या अशा ऐतिहासिक धारणांना कायम ठेवते, ज्यांचे उच्चाटन करणे हे संविधानाचे उद्दिष्ट आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नाेंदवले.

याचिकाकर्त्या कुलसुम निशा यांना चार आठवड्यांच्या आत रास्त दराचे दुकान मंजूर करण्याचे निर्देश देताना न्यायालयाने नमूद केले की विवाहित असूनही त्या आपल्या आई आणि चार बहिणींसाेबत राहत हाेत्या आणि त्यांचा उदरनिर्वाह करत हाेत्या.
निशा या त्यांच्या आईवर अवलंबून हाेत्या. मार्च 2024 मध्ये आईच्या निधनानंतर त्यांनी हे दुकान चालवण्यासाठी अर्ज केला हाेता.
मात्र, त्यांच्या मार्गात उत्तर प्रदेश अत्यावश्यक वस्तू (विक्री आणि वितरण नियंत्रण नियमन) आदेश, 2016 अंतर्गत ऑगस्ट 2019 मध्ये जारी करण्यात आलेला एक नियम अडथळा ठरला. या नियमानुसार कुटुंब या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळण्यात आले हाेते.
हा भेदभाव लिंग-आधारित रूढ समजुतीवर आधारित न्यायमूर्ती आराधे यांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे की, मुलाची वैवाहिक स्थिती काहीही असली तरी ताे कुटुंबाचा भाग राहताेच. मात्र, मुलीच्या बाबतीत, केवळ तिचे लग्न झाले आहे या कारणास्तव तिला त्यातून वगळले जाते. हा भेदभाव एका लिंग-आधारित रूढ समजुतीवर आधारित आहे, ज्यानुसार लग्नानंतर मुलगी दुसऱ्या कुटुंबाची सदस्य बनते आणि तिचे माहेरच्या कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तुटतात.