कबड्डी, खाे-खाेत महावितरण, राजस्थान संघाची आगेकूच

    12-May-2026
Total Views |
 

rj 
एमएसईबी हाेल्डिंग कंपनीद्वारे आयाेजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या 45 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत झालेल्या चुरशीच्या साखळी सामन्यांत महावितरणच्या पुरुष व महिला संघाने प्रतिस्पर्धी संघांवर सहज विजय मिळवला. खाे-खाेमध्ये महावितरणच्या पुरुष संघासह राजस्थानच्या महिला व पुरुष संघाने आगेकूच केली.बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या 47व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खाे-खाे व बास्केटबाॅलच्या तीन दिवसीय स्पर्धेला प्रारंभ झाला.महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते क्रीडाज्याेत प्रज्ज्वलित करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
 
पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) सुनील काकडे, आयाेजन समितीचे उपाध्यक्ष व मुख्य अभियंता अनिल काेलप (महापारेषण) व अशाेक घाडगे, मुख्य अभियंता धनराज पेठकर, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) भूषण कुलकर्णी, मुख्य औद्याेगिक संबंध अधिकारी संजय ढाेके (महावितरण) व पुरुषाेत्तम वारजुरकर (महानिर्मिती), विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे अध्यक्षजिग्नेश राय, सरचिटणीस नरेश कुमार, उपाध्यक्ष भरत पाटील, खजिनदार ललित गायकवाड यांच्यासह विविध राज्यांतील खेळाडू उपस्थित हाेते. उद्घाटन साेहळ्यात सर्व खेळाडूंनी संचलन करत पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
 
पहिल्या सत्रात कबड्डी, खाे-खाेचे साखळी सामने झाले. कबड्डीच्या सामन्यांत महापारेषण संघाने मध्य प्रदेशच्या एमपी पाॅवर संघाचा 3 गुणांनी पराभव केला.महावितरणने एकतर्फी वर्चस्व गाजवत महानिर्मिती संघाचा 26 गुणांनी पराभव केला. पंजाब पाॅवरने उत्तराखंडच्या पाॅवर ट्रान्समिशन कंपनीचा 17 गुणांनी आणि हरियाणा संघाने गुजरात संघाचा 30 गुणांनी पराभव केला. कबड्डीच्या महिला गटात हिमाचल प्रदेशने महापारेषण संघाचा 32 गुणांनी, तर महावितरणने हरियाणा पाॅवर संघाचा 48 गुणांनी एकतर्फी पराभव केला.खाे-खाेच्या महिला गटात राजस्थान संघाने गुजरात ऊर्जा विकास निगम संघाचा पराभव केला. पुरुष गटात हरियाणा पाॅवर संघाने मध्य प्रदेश पाॅवर संघाचा, राजस्थान विद्युत निगम संघाने गुजरात ऊर्जा विकास निगमचा, तर राष्ट्रीय खाे खाे संघाचा कर्णधार व महावितरणचा खेळाडू प्रतीक वाईकर याच्या नेतृत्वात महावितरणने हिमाचल प्रदेश राज्य विद्युत मंडळ संघाचा सहज पराभव केला.