शाॅपिंग व्यसनावर मात करा

    06-Apr-2026
Total Views |
 

shopping 
जगप्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ वाॅरेन बफे यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, जर तुम्ही सतत अशा वस्तुंची खरेदी करता ज्यांची तुम्हाला आवश्यकता नाही, तर लवकरच तुमच्यावर अशा वस्तू विकण्याची वेळ येईल ज्यांची तुम्हाला आवश्यकता आहे.उगीच बाजारात सेल लागला किंवा फ्लिपकार्ट अ‍ॅमाेझाॅनवर महासेल लागला म्हणुन डिस्काऊंटच्या माेहापायी आपण जर अशा वस्तुही खरेदी करत असू ज्यांची आपल्याला तितकी गरज नसेल तर ही घातक सवय आहे. आपल्या खिशाला पडलेलं हे असं छिद्र आहे, ज्यातून गळून गेलेला पैसा आपल्याला समजतच नाही.हे आपल्याला गरीबीकडे घेऊन जातं. मग खरेदी करणं साेडुन गरीबासारखं जगावं आणि कंजुष बनुन एके दिवशी मरुन जावं का? नाही! कुठल्याही वस्तुची खरेदी करण्याआधी इच्छा आणि गरज यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे.
 
आपले कित्येक माेठे खर्च हे गरजेपाेटी नाही, केवळ भावनांच्या भरात हाेतात. नंतर त्या वस्तुंकडे, कपड्यांकडे आपण ढुंकूनही बघत नाही. तुम्ही शाॅपिंगच्या व्यसनाने त्रस्त असाल तर टु वीक फाॅर्मुला वापरा. समजा, तुम्ही तुमच्या फेव्हरेट ब्रँडच्या शूजची आकर्षक जाहिरात बघितली. ते पाहून तुम्हाला नवे शूज घ्यायची तीव्र इच्छा झाली, तर दाेन आठवडे थांबा, तत्काळ खरेदी करू नका.ही तात्पुरत्या भावनांची उबळ असेल तर पंधरा दिवसात ती शमून जाईल. आकर्षण वाटेनासे हाेईल. सध्याचे शूज छानच आहेत, असा मनाचा काैल मिळेल. खराेखरच गरज असेल तर मात्र जास्त विचार न करता खरेदी करून माेकळे व्हा व पुढे पडा. मनातल्या मनात घुसमटत राहू नका. हीच गाेष्ट नवा माेबाईल, नवी गाडी, नवे कपडे, नवी साधने, मुव्ही, पार्टी, चैनीच्या गाेष्टी या सगळ्यांसाठी लागू पडते. माझा स्वभावच खर्चिक आहे, मला सगळे ब्रँडेडच लागते, आयुष्य एकदाच मिळते पैशाचा उपभाेग घ्यायलाच हवा, असे लंगडे समर्थन देऊन विनाकारण अनावश्यक गाेष्टींवर खर्च करू नका.