करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यात मंदिराभाेवतीच्या परिसरातील जागेचे संपादन करण्यात येणार आहे. या परिसरातील मिळकतींचे व जागेचे मूल्यांकन करून महिनाभरात त्याचा भूसंपादन अहवाल शासनाला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अंबाबाई मंदिराच्या 1400 काेर्टीच्या आराखड्यातील पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरू झाले आहे. सध्या मंदिराच्या संवर्धनाचे काम केले जात आहे. त्याचवेळी पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठीची कार्यवाही सुरू आहे.
त्यासाठी करवीरच्या प्रांताधिकारी माैसमी चाैगुले यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे.या समितीची नुकतीच बैठक झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, नायब तहसीलदार ऋतुराज निकम, देवस्थान समितीचे अभियंता सुयश पाटील यांच्यासह महापालिका, भूसंपादन, मुद्रांक शुल्क, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते.
भूसंपादनाच्या पहिल्या टप्प्यात महाद्वारातील मंदिराला लागून असलेल्या दहा मीटर परिसरातील मिळकर्तीचे संपादन केले जाणार आहे. पूर्व उत्तर व दक्षिण दरवाजाकडील मिळकती संपादित केल्या जाणार आहेत. तेथे एकूण किती मिळकती आहेत, त्यात रहिवासी किती आणि व्यावसायिक किती, त्या मिळकतींच्या बांधकामाचे क्षेत्र किती आहे, मिळकतींमध्ये काही न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे का, आदी बाबी सर्वेक्षणाद्वारे तपासल्या जाणार आहेत.सर्वेक्षणाच्या आधारावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या जमिनीचे मूल्यांकन केले जाईल. त्या मूल्यांकनानुसार भरपाई दिली जाणार आहे. संबंधित सर्व विभागांनी पुढील महिनाभरात या मिळकतींचे सर्वेक्षण करून त्यांचा अहवाल समितीला सादर करायचा आहे. या अहवालावरून समर्पक निष्कर्ष काढून ताे शासनाला सादर केला जाईल. शासनाकडे हा प्रस्ताव गेल्यानंतर मिळकतधारकांना भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.