या तरुणीने नदीशी लग्न केले आणि लग्नाचा तिसरा वाढदिवस देखील साजरा केला

    01-Apr-2026
Total Views |
 

river 
 
इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे राहणाऱ्या मेग नावाच्या 29 वर्षीय तरुणीने नदीला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. मेगने एव्हाॅन नावाच्या नदीशी लग्न केले असून, ती आता 3 वर्षांपासून या नात्यात आहे. अलीकडेच, मेगने साेशल मीडियावर तिच्या लग्नाची एक जुनी क्लिप शेअर करून लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला आणि त्या पाेस्टमध्ये तिने म्हटले आहे की, नदीबद्दलचे तिचे प्रेम काळासाेबत अधिकच घट्ट हाेत आहे. मेग एक संशाेधक आणि लेखिका आहे. तिने जून 2023 मध्ये नदीशी लग्न केले. ती सांगते की, ती आपल्या जाेडीदारासाेबत वेळ घालवण्यासाठी नदीवर जाते.
 
कडाक्याची थंडी असाे किंवा पाऊस, मेगला एव्हाॅन नदीला आपला जीवनसाथी मानून तिच्यासाेबत वेळ घालवायला आवडते. ती म्हणते की, निसर्गाशी जाेडले जाण्याचा आणि निसर्गाशी एकरूपता व ओळख अनुभवण्याचा हा एक आध्यात्मिक मार्ग आहे. नदीशी लग्न करणे हा काही स्टंट नाही. या निर्णयाद्वारे, नद्यांमधील वाढत्या प्रदूषणाकडे आणि घाणीकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याची मेगची इच्छा आहे. नद्या या मानवाचा जीवनस्राेत आहेत हे आपल्याला कळावे, यासाठी मेगने नद्या स्वच्छ ठेवण्याची माेहीम हाती घेतली आहे.तिने एक गट स्थापन केला आहे, जाे नद्यांना माणसांप्रमाणे सजीवांचा दर्जा मिळावा यासाठी लढत आहे.