5 वर्षांत पुरुषांचा दागिना व्यवसाय तिपटीने वाढला

    01-Apr-2026
Total Views |
 



gold
 
 
प्रसिद्ध हाॅलिवूड अभिनेता आणि निर्माता डॅनिंग टॅटम जेव्हा ऑस्कर पुरस्कार साेहळ्याच्या रेड कार्पेटवर ‘टिफनी अँड कंपनी’चा सुंदर ब्राेच (दागिना, जाे कपड्यांना त्यांना एकत्र बांधण्यासाठी असताे/आकर्षक पिन) लावून अवतरला, तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. दुसरीकडे, अभिनेता टिमाेथी चॅलेमेट याने ‘कार्टियर’चे हिरेजडित दागिने वापरून पुरुषांच्या फॅशनमध्ये एक नवा ट्रेंड सुरू केला. पश्चिमेकडील देशांमध्ये अनेक वर्षांपासून रुजलेला हा ‘ट्रेंड’ आता भारतातही वाढत आहे. भारतीय पुरुषांमध्ये दागिन्यांची आवड केवळ वाढलीच नाही, तर ती आता एक गरज आणि फॅशन स्टेटमेंट बनली आहे.
 
पुरुषांचा कल : 2025-26 या आर्थिक वर्षात कल्याण ज्वेलर्सने पुरुषांच्या दागिन्यांच्या या प्रकारात दुहेरी वाढ नाेंदवली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या एकूण महसुलात या प्रकारच्या, पुरुषांच्या दागिन्यांचा वाटा लक्षणीय हाेता.केवळ लग्नसराईतच नव्हे, तर काॅर्पाेरेट क्षेत्रातील यश, लग्नाचे वाढदिवस, सण-उत्सव आणि वैयक्तिक यशाच्या क्षणी स्वतःला दागिने भेट देण्याकडे पुरुषांचा कल वाढला आहे. आजचा 25 ते 45 वयाेगटातील पुरुष वर्ग हा या बाजारपेठेचा मुख्य ग्राहक आहे.भारतीय बाजारपेठेतील माेठी झेप : इंडस्ट्री एक्झिक्युटिव्हच्या मते, 2025 मध्ये पुरुषांच्या दागिन्यांच्या विक्रीत दरवर्षी 25 ते 30% वाढ झाली आहे. ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असाेसिएशन’च्या आकडेवारीनुसार, 2025मध्ये भारताची एकूण दागिन्यांची बाजारपेठ 8 ते 9 लाख काेटी रुपयांवर पाेहाेचली आहे, ज्यामध्ये पुरुषांच्या दागिन्यांचा वाटा तब्बल 15% आहे.
 
विशेष म्हणजे, 2020 पासून या वाट्यात तीन पटीने वाढ झाली आहे, जे दागिन्यांच्या विषयी पुरुषांची बदलती आणि सकारात्मक मानसिकता दाखवत आहे.लग्नापलीकडची फॅशन : कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरामन यांच्या मते, ‘जेव्हा एखादी माेठी सेलिब्रिटी व्यक्ती स्वतः च्या लग्नामध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रमात विशिष्ट दागिने परिधान करते, तेव्हा सामान्य पुरुषांमध्येही त्याबद्दलची ओढ वाढते. पूर्वी दागिने म्हणजे केवळ लग्नाची भेट किंवा कार्यक्रमांमध्ये औपचारिक मानले जायचे, परंतु आता ते ‘ग्रूम स्टाइलिंग’चा अविभाज्य भाग बनले आहेत. आता पुरुषांचे दागिने केवळ लग्नापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर दैनंदिन पेहरावाचा भाग बनत आहेत.