खारघरमध्ये ‘हिंद- दी- चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी वर्षानिमित्त आयाेजित समागमात भक्ती, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचे अद्वितीय वातावरण अनुभवायला मिळते आहे. देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसर पूर्णपणे आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाला आहे.समागमस्थळी अखंड कीर्तन सुरू असून, वाहे गुरू आणि बाेले साे निहाल, सत श्री अकालच्या जयघाेषाने वातावरण भारावून गेले आहे. ‘विरासत- एसीख’ या प्रदर्शनातून शीख समाजाचा इतिहास, शाैर्यगाथा आणि परंपरा सचित्र स्वरूपात मांडण्यात आल्या आहेत.शीख याेद्ध्यांनी वापरलेली शस्त्रे आणि ऐतिहासिक माहिती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी हाेत आहे.
कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सेवा सुरू असून, सर्व धर्मीयांना प्रेमपूर्वक भाेजन दिले जात आहे. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वाढप, स्वच्छता व व्यवस्थापनाचीजबाबदारी सांभाळली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या वतीने आराेग्य शिबिराचे आयाेजन करण्यात आले असून, तज्ज्ञ डाॅक्टरांच्या उपस्थितीत विविध तपासण्या व औषधाेपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.डाेळ्यांची तपासणी करून माेफत चष्मे वितरित करण्याची साेयही करण्यात आली आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे. बंजारा व लबाना समाजाच्या महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवले. शिखांची पारंपरिक मार्शल आर्टची प्रात्यक्षिकेही पाहायला मिळाली. 33 पार्किंग स्थळे, माेफत पिक अप-ड्राॅप सुविधा, कडक वाहतूक नियाेजन, पाेलीस व अग्निशामक दलाच्या बंदाेबस्तामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडत आहे. स्वच्छता रथ व कचरा संकलन व्यवस्था सतत कार्यरत असल्याने परिसर स्वच्छ ठेवण्यात आला आहे.