राज्य सरकारी आणि बंध पात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. हाेळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून ही भेट देण्यात आली असून, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्के झाला आहे.महागाई भत्त्यातील ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जुलै 2025 पासून लागू हाेणार आहे.वित्त आणि नियाेजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत महागाई भत्त्यात वाढीच्या निर्णयाची माहिती दिली.राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध आहे. आर्थिक सुरक्षितता राखताना कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे कर्मचारी अधिक उत्साहाने काम करतील आणि राज्याच्या विकासात याेगदान देतील, असा विश्वास सरकारला असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारीपासून राेखीने देण्यात येणार असून, जुलै 2025 ते ऑक्टाेबर 2025 या कालावधीतील थकबाकीची रक्कम गुढीपाढव्याच्या निमित्ताने मार्चमध्ये देण्यात येईल. नाेव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सुमारे 5 लाख 96 हजार शासकीय कर्मचारी, तसेच सुमारे 8 लाख 72 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. याविषयीचा शासननिर्णयही जारी करण्यात आला आहे. यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता समान पातळीवर आला आहे.