छत्रपती शिवरायांच्या सागरी साम्राज्याचा हाेणार अभ्यास

    03-Mar-2026
Total Views |
 
 

CS 
सिंधुदुर्गाच्या अथांग सागरात दडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि त्यांच्या आरमारी रणनीतीचा वारसा आता अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने जगासमाेर येणार आहे. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकाेट आणि सर्जेकाेट या चार महत्त्वाच्या सागरी किल्ल्यांचा सखाेल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठामार्फत स्वतंत्र अध्यासन केंद्र स्थापन करण्यास सांस्कृतिक कार्य विभागाने 50 लाखांचा निधी मंजूर केला आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या 358व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेले आश्वासन आता प्रत्यक्षात उतरले असून, याला शासकीय मान्यता लाभली आहे. येथील स. का. पाटील महाविद्यालयात डाॅ.
ज्याेती ताेरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र कार्यरत हाेणार आहे. या निर्णयामुळे ऐतिहासिक संशाेधनाला नवी उभारी मिळणार आहे.हे अध्यासन केंद्र केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी बहुआयामी कार्य करणार आहे.
 
या केंद्रामार्फत किल्ल्यांशी संबंधित जुनी कागदपत्रे, ऐतिहासिक दाखले आणि संशाेधनात्मक प्रबंधांचे संकलन केले जाईल. विशेषतः युवा संशाेधकांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरणार असून, तेथे विविध व्याख्यानमालांचे आयाेजन केले जाईल.सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकाेट आणि सर्जेकाेट या चारही किल्ल्यांच्या वारशाचे शास्त्रशुद्ध नाेंदणीकरण केल्यामुळे भविष्यात या वास्तूंच्या संवर्धनाला माेठी मदत हाेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सागरी किल्ले उभारताना जी दूरदृष्टी ठेवली हाेती, त्याचा सखाेल अभ्यास या केंद्राच्या माध्यमातून केला जाईल.शिवकाळात हे भाग व्यापाराचे प्रमुख केंद्र हाेते, त्यावेळच्या आर्थिक नीतीचे ऐतिहासिक दस्तावेज जमा करून त्यावर प्रकाश टाकला जाणार आहे.संशाेधनासाठी येणाऱ्या युवकांना आर्थिक अडचण भासू नये म्हणून प्राथमिक सुविधा शासनामार्फत विनामूल्य पुरवल्या जाणार आहेत.