हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने देशातील पहिली एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपाेर्टेशन सिस्टीम महामार्गावर बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम हाेऊन भविष्यात अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत हाेईल, अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकाेरे-बाेर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली.समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी मानांकनानुसार सर्व आवश्यक उपाययाेजना करण्यात येत आहेत. या महामार्गावर क्रॅश बॅरियर्स, रबर स्ट्रिप्स, साईनबाेर्ड आदी सुविधा बसवण्यात आल्या आहेत.
महामार्गावर नियमित पाेलीस पेट्राेलिंग, तसेच अॅम्ब्युलन्स पेट्राेलिंग सुरू असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय 21 क्यूआरव्ही (क्विक रिस्पाॅन्स व्हेईकल)पथके कार्यान्वित असल्याचे साकाेरे- बाेर्डीकर यांनी सांगितले.भिवंडी ठाणे मार्गाचे काम सुरू असून, ठाणे-मुंबईदरम्यान एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येणारा रिंग राेड आणि उन्नत मार्ग समृद्धी महामार्गाला जाेडला जाणार आहे.प्रवास गतिमान करण्यासाठी विविध जाेडरस्त्यांचे नियाेजन करण्यात आले असून, ही कामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही साकाेरे-बाेर्डीकर यांनी सांगितले.