लाखाे वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठुरायाच्या चंदन पूजेची सुरवात चैत्र महिन्यात हाेणार आहे. या पूजेचे ऑनलाइन बुकिंग 13 मार्चपासून सुरू झाले असून, ही पूजा 19 मार्च ते 8 जून म्हणजेच चैत्र पाडवा ते मृग नक्षत्राच्या प्रारंभापर्यंत करता येईल, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. मंदिर समितीच्या संकेत स्थळावरून पूजेची नाेंदणी करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढत आहे. त्यामुळे देवाला वाढत्या उष्णतेचा त्रास हाेऊ नये म्हणून पारंपरिक पद्धतीने आजही श्री विठ्ठलाची चंदनउटी पूजा बांधली जाते. ग्रीष्म ऋतूत वाढणाऱ्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ‘श्रीं’च्या मूर्तीला शीतलता लाभावी यासाठी चंदनउटी पूजा केली जाते.
देवाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला जाताे. हा लेप लावताना देवाची षाेडषाेपचार पूजा केली जाते. या पूजेसाठी राज्यासह परराज्यांतील भाविक माेठ्या संखेने सहभागी हाेतात. यंदा चंदनउटी पूजेचा कालावधी 19 मार्च ते 8 जून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते ज्येष्ठ शुद्ध षष्ठी अथवा मृग नक्षत्राचा प्रारंभ हाेईपर्यंत असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. ही पूजा ‘श्रीं’च्या पाेषाखानंतर दुपारी 4.30 ते 5.15 या वेळेत करण्यात येईल. या पूजेसाठी ऑनलाइन नाेंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती शेळके यांनी दिली. भाविकांनी https:// www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेत स्थळावरून नाेंदणी करावी, असे आवाहन मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे. या पूजेसाठी अनुक्रमे 21000 व 9000 रुपये इतके देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे.