राज्य परिवहन विभागात (एसटी) एकूण 17742 पदांची भरती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला दिला आहे. वित्त विभागाची परवानगी मिळताच ही मेगा भरती केली जाईल. या भरती प्रक्रियेत सध्या कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी घाेषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली. एसटीत 2022 साली माेठा संप झाला हाेता. त्या काळात बससेवा विस्कळीत हाेऊ नये म्हणून कंत्राटी भरती करण्यात आली. ही भरती तात्पुरती हाेती. संपाच्या काळात सुमारे 12500 हजार बस हाेत्या. सध्या सुमारे 14 हजार बस उपलब्ध आहेत. महायुती सरकारच्या काळात दरवर्षी 5 हजार नवीन बस खरेदीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.त्यानुसार 8 हजार बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यापैकी 3 हजार बसचे वितरण सुरू झाले आहे. बसची संख्या वाढत असल्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियु्नती करण्यात येत असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.