ईसीजी : हृदयाची माहिती देणारा बातमीदार

    14-Mar-2026
Total Views |
 
 
 

ECG 
ईसीजी हा आपल्या हृदयाच्या आराेग्याची माहिती देणारा बातमीदार आहे. आपल्या हृदयाचा ताल जाेवर नियमित आणि याेग्य रितीने राखला जाताे ताेवर एखाद्या पंपासारखे काम करत शुद्ध रक्त शरीरभर खेळवत प्रत्येक अवयवाला, प्रत्येक पेशीला आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम हृदय इमानेइतबारे बजावत राहातं.त्यासाठी हृदयाच्या स्नायूला आकुंचन आणि प्रसरण पावावं लागतं.आकुंचन पावून ते झेप घेण्याच्या स्थितीत येतं आणि पुढच्याच क्षणी प्रसरण पावत आपल्या डाव्या खालच्या कप्प्यातील रक्त जाेराने बाहेर फेकत राहतं. पण हृदयाच्या स्नायूला नेमानं हे आकुंचन प्रसरण पावायला मदत करतात ते काही विद्युतसंदेश. हृदयाच्या प्रत्येक ठाेक्यागणिक एक विजेचा लाेळ वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे पसरत जाताे. घाेड्याला टाच मारून तुडवायला लावावं व तसा हा विद्युतस्पंद हृदयाला आकुंचन प्रसरण पावायला लावताे. या विद्युतस्पंदाचा आलेख म्हणजे ईसीजी.
 
या आलेखावरून हृदयाच्या निरनिराळ्या भागातल्या या विद्युतस्पंदाच्या स्थिती विषयीची बत्तंबातमी आपल्याला मिळत राहते.थाेडक्यात ईसीजी ही हृदयाच्या आराेग्याची माहिती देणारी एक साधी निर्धाेक आणि वेदनारहित अशी निदान पद्धती आहे.हा आलेख मिळवण्यासाठी हृदयाच्या बारा निरनिराळ्या बिंदूंच्या ठिकाणी असलेल्या विद्युतस्पंदांची माहिती मिळते. त्यासाठी बारा निरनिराळे इलेक्ट्राेड या बिंदुंकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या शरीराच्या निरनिराळ्या भागातील रक्तवाहिनींना जाेडले जातात. हृदयाच्या प्रत्येक ठाेक्यागणिक या बिंदूंवरील विद्युतस्पंदांच्या स्थितीची माहिती गाेळा केली जाते.हा आलेख पाहून डाॅक्टरांना हृदयाचे ठाेके नियमित पडत आहेत काय? याची धडधड याेग्य त्या गतीनेच हाेत आहे की नाही? हे ठरवता येतं.
 
हा विद्युतस्पंद हृदयभर फिरत असताना प्रत्येक बिंदूवर ताे निश्चित वेळेलाच पाेहाेचताे आहे व त्याची तीव्रताही याेग्य तीच आहे याची निश्चिती करता येते.जर यापैकी काेणत्याही पैलू मध्ये काही बदल आढळला तर त्यावरून हृदयाच्या कामात काही अडथळा येत असल्याचं निदान करता येतं. तर हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल तर त्याची खातरजमाही करून घेता येते.हृदयाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची काेंडी झाली असेल तर त्याविषयीचीही माहिती मिळू शकते.बऱ्याच वेळा आपण विश्रांती घेत असताना ईसीजीची स्थिती सामान्य असते. त्यामुळं रक्तवाहिन्यांची काेंडी झाली आहे की काय हे समजत नाही.अशा वेळेला मग ट्रेडमिलवर चालायला लावून म्हणजेच हृदयावर थाेडा दबाव आणत त्याला कामाला लावून मग परत ईसीजीचा आलेख घेतला जाताे.यालाच स्ट्रेस टेस्ट असं म्हणतात.या चाचणीतून रक्तवाहिन्यांच्या चाेदण्याविषयी माहिती मिळू शकते.