राज्यातील मुद्रांक शुल्क गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणांत आतापर्यंत माेठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून, मिरा-भाईंदरमधील मुद्रांक शुल्क गैरव्यवहार प्रकरणी सुमारे 133 काेटींची वसुली करण्यात आल्याची माहिती महसूल राज्यमंत्री याेगेश कदम यांनी विधानसभेत दिली.मिरा-भाईंदरमधील मुद्रांक शुल्काच्या 492 प्रकरणांची चाैकशी सुरू करण्यात आली असून, त्यापैकी 350 प्रकरणांत अंतिम आदेश देण्यात आले आहेत.उर्वरित 142 प्रकरणांची चाैकशी सुरू असून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. या प्रकरणांत आतापर्यंत सुमारे 35 काेटींचे मुद्रांक शुल्क आणि जवळपास 98 काेटींचा दंड आकारण्यात आला असून, संबंधितांना नाेटिसाही देण्यात आल्या आहेत. या प्रकरणांची सखाेल चाैकशी करण्यासाठी नाेंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर दाेषींवर कारवाई करण्यात येईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.चारकाेप येथील कांदळवन क्षेत्रातील कथित अतिक्रमणांबाबत 48 तासांत जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. तेथे बेकायदा बांधकाम आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले जातील, असेही कदम यांनी सांगितले.