स्वच्छतेच्या तक्रारींसाठी ‘सफाई मित्र’ विशेष माेबाइल अ‍ॅपचे लाेकार्पण

    14-Mar-2026
Total Views |
 

App 
 
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे यासाठी महापालिकेने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. महापालिका मुख्यालयात महापाैर अजीव पाटील यांच्या हस्ते ‘सफाई मित्र’ या विशेष माेबाइल अ‍ॅपचे लाेकार्पण करण्यात आले. यामुळे नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचे फाेटाे थेट महापालिकेला पाठवता येणार असून, त्यावर स्वच्छता विभागाकडून 24 तासांत कारवाई करणे बंधनकारक असणार आहे. कचरा उचलला न गेल्याससंबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.शहरामध्ये महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग दैनंदिन स्वच्छता करताे. जमा हाेणारा कचरा कचपाडेपाेवर नेऊन टाकला जाताे. मात्र, शहराच्या वाढत्या लाेकसंख्येमुळे कचऱ्याचे प्रमाणअधिकच वाढू लागले आहे. बहुतेक जण कचराकुंडीत कचरा न टाकता थेट रस्त्यांवर टाकतात, रस्त्यांच्या कडेलाही कचऱ्याचे ढिगारे साचून राहतात.
 
त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. त्मुळे आराेग्यविषयक समस्यांनाही ताेंड द्यावे लागते.नागरिकांच्या स्वच्छतेविषयीच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता महापालिकेने या अ‍ॅपच्या मदतीने या समस्या साेडवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच या अ‍ॅपचे लाेकार्पण करण्यात आले. हे अ‍ॅप अँड्राॅइड फाेनवर डाऊनलाेड करता येईल. शहरात काेठेही अस्वच्छता आढळल्यास नागरिक त्या जागेचा फाेटाे या अ‍ॅपवर अपलाेड करू शकतात. ही तक्रार प्राप्त हाेताच संबंधित प्रभागाच्या स्वच्छता विभागाला त्याची माहिती मिळेल. विशेष म्हणजे तक्रार मिळाल्यापासून 24 तासांच्या आत त्या जागेची स्वच्छता करणे प्रशासनाला बंधनकारक असणार आहे. ठेकेदाराने ताे कचरा उचलला नाही, तर त्याला 10 हजारांचा दंड आकारला जाईल. जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करतील त्यांनाही एक हजारांचा दंड केला जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.