शहरात घरांच्या टेरेसवर उतरणार इलेक्ट्रिक टॅक्सी

    10-Mar-2026
Total Views |
 


taxi
 
 
 
‘काॅन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (सीआयआय) ने एका अभ्यासात म्हटले आहे की, कार्यालयांच्या इमारती, रुग्णालये आणि निवासी संकुलांची रिकामी छते (टेरेस) इलेक्ट्रिक एअर टॅक्सींच्या लँडिंग आणि टेक-ऑफसाठी (व्हर्टीपाेर्ट्स) वापरली जाऊ शकतात. यामुळे उत्पन्नाचा एक अतिरिक्त स्राेत निर्माण हाेऊ शकताे.‘नेव्हिगेटिंग द फ्युचर ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड एअर माेबिलिटी इन इंडिया’ नावाच्या अहवालात, सीआयआयने गुडगाव, कनाॅट प्लेस आणि जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाेडणाऱ्या पायलट इलेक्ट्रिक ‘व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग’ काॅरिडाॅरचा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) प्रवासाचा वेळ कमालीचा कमी हाेऊ शकताे.नागरी विमान वाहतूक मंत्री राममाेहन नायडू किंजरापू यांनी प्रसिद्ध केलेल्या या अहवालात ‘अ‍ॅडव्हान्स एअर माेबिलिटी’ (ईएम) हा शहरी वाहतूक काेंडीवरचा एक प्रभावी उपाय म्हणून मांडला आहे.
 
हा उपक्रम भारताच्या 2070 पर्यंतच्या ‘नेट झीराे’ वचनबद्धतेशी सुसंगत असून यामध्ये शून्य-उत्सर्जन करणाऱ्या विमानांचा वापर केला जाईल.अभ्यासानुसार, जमिनीवर आधारित सुविधा निर्माण करण्यात जमिनीच्या कमतरतेमुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे अडथळे येतात, अशा वेळी छतावरील हे व्हर्टीपाेर्ट्स एक उत्तम पर्याय ठरू शकतात.सुरुवातीच्या काळात याचा वापर ड्राेनआधारित लाॅजिस्टिक आणि औषधांच्या वितरणासाठी केला जाऊ शकताे. सध्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नियम इमारतींच्या नियमित छतावरील एअर टॅक्सीच्या ऑपरेशन्सना परवानगी देत नाहीत, परंतु भविष्यात सुरक्षिततेच्या चाैकटीत बदल करून ही क्षमता वापरता येऊ शकते. या अहवालात वैद्यकीय लाॅजिस्टिक, अवयवदानाशी संबंधित वाहतूक आणि एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवांसारखे महत्त्वाचे उपक्रम सुचवण्यात आले आहेत, 250 किलाेमीटर पर्यंतचा प्रवास या उपक्रमांसाठी सहज हाेईल.