मूलचंद’ने थकवली 13 काेटींपेक्षाही अधिक पीएफ रक्कम

    10-Mar-2026
Total Views |
 
 

chand 
 
भविष्य निर्वाह निधी संघटनने (पुणे विभाग) मूलचंद मिल प्रायव्हेट लिमिटेड आणि मूलचंद सिल्क सारीज, पुणे यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची पीएफची थकबाकी पुढील 60 दिवसांत त्यांच्या पीएफ खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. 2010 ते 2023 पर्यंत कंपनीने त्यांच्या दहा हजार कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात अनुक्रमे 11 काेटी 98 लाख 6 हजार 874 रुपये आणि 1 काेटी 50 लाख, 49 हजार 143 रुपये अशी एकूण 13 काेटी 48 लाख 56 हजार 17 रुपये एवढी पीएफ रक्कम थकविल्यामुळे, ती संपूर्ण रक्कम जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.मूलचंद मिल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मूलचंद सिल्क सारीज, पुणे यांच्याकडील कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी संगठन (पुणे विभाग) यांच्याकडे कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार भविष्य निर्वाह निधी आयुक्त (वन) अमित वशिष्ठ यांच्या नेतृत्वाखाली पीएफ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने या प्रकरणाची सुनावणी केली. तपासणी दरम्यान, कंपनीने दहा हजार कर्मचाऱ्यांची पीएफ रक्कम जमा करण्यात अनियमितता दर्शविल्याचे उघड झाले.
 
काही कर्मचाऱ्यांना पीएफसाठी पात्र असूनही अपात्र दाखवण्यात आले. काही कर्मचाऱ्यांच्या पीएफची संपूर्ण रक्कम भरली नाही. पीएफच्या रकमेतही विसंगती हाेती.वस्तुतः कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात पीएफची पूर्ण रक्कम जमा करण्यात आली नाही. हेही तपासणीत उघड झाले.परिणामी, पीएफ कार्यालयाकडून कंपनीला नाेटीस बजावण्यात आली.पीएफ कायद्याच्या कलम 7(अ) अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली.सुनावणी दरम्यान, कंपनीच्या वकिलांनी कंपनीची बाजू मांडली, तसेच पीएफ कार्यालयाच्या वकिलांनीही बाजू मांडली.सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात आली.तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे (जबाब) देखील नाेंदवण्यात आले. तपासात मूलचंद मिल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या 9,500 कर्मचाऱ्यांसाठी आणि मूलचंद सिल्क सारीजच्या 500 कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या रकमेबद्दल कंपनीने केलेली अनियमितता उघडकीस आली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे (पुणे विभाग) आयुक्त (वन) अमित वशिष्ठ यांनी कंपनीला पुढील साठ दिवसांत थकबाकीची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत.