बावधन बुद्रूक परिसरातील अनधिकृत रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांविराेधात नागरिकांचा संताप उसळला असून, त्याविराेधात रविवारी ओंकार गार्डन चाैकात आंदाेलन करण्यात आले. यामध्ये नागरिक माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. बावधन परिसरात सुरू असलेले काही रेडीमिक्स प्रकल्प विनापरवानगी सुरू असल्याचा आराेप नागरिकांनी केला. या प्रकल्पांमधून माेठ्या प्रमाणात धूळ व प्रदूषण निर्माण हाेत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आराेग्यावर गंभीर परिणाम हाेत आहे.या प्रकल्पांसाठी ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांवर सतत वाहतूक काेंडी हाेत असून, अपघातांचा धाेका वाढल्याचीही तक्रार यावेळी नागरिकांनी केली. अनधिकृत रेडीमिक्स प्रकल्प तात्काळ बंद करण्यात यावेत, परिसरातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे आणि अवजड वाहनांच्या अनियंत्रित वाहतुकीवर प्रशासनाने कठाेर कारवाई करावी. नागरिकांच्या आराेग्याशी व सुरक्षिततेशी तडजाेड सहन केली जाणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला.भाजपचे नगरसेवक किरण दगडे-पाटील यांनी आंदाेलनासाठी पुढाकार घेतला.