तारापूरमध्ये ऑक्टाेबर 1969 मध्ये सुरू झालेल्या देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्राथमिक पुनर्संचरण लूपची वाहिनी बदलण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण झाले आहे. सहा वर्षांनंतर 160 मेगावाॅट क्षमतेची वीजनिर्मिती या अणुभट्टीतून झाली.तारापूर 1 व 2 या अणुभट्ट्यांचे किमान 10 वर्षे आयुर्मान लक्षात घेता त्यांच्या नूतनीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला यश आले आहे.बाॅईलिंग वाॅटर रिक्टरमधून वीजनिर्मिती करणाऱ्या दाेन अणुभट्ट्या तारापूरमध्ये 1969 मध्ये कार्यरत करण्यात आल्या.मात्र, तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला 220 मेगावाॅट वीजनिर्मिती क्षमता 160 मेगावाॅट इतकी मर्यादित ठेवण्यात आली हाेती.सध्या प्रेशराइज हेवी वाॅटर रिक्टर पद्धतीच्या प्रत्येकी दाेन 540 मेगावाॅट अणुभट्ट्यांच्या (3 व 4) साह्याने तेथे 1400 मेगावाॅट वीजनिर्मिती हाेत आहे.
तारापूरच्या अणुभट्टी-1 मध्ये नियमित तपासणीदरम्यान रिसर्क्युलेशन पायपिंगच्या वाहिनीची दूरवस्था झाल्याचे निदर्शनास आले. त्यातून गळतीची शक्यता लक्षात घेता जानेवारी 2020 मध्ये अणुभट्टी बंद ठेवण्याचा निर्णय झाला. जुलै 2020 मध्ये अणुभट्टी 2 याच समस्येमुळे बंद करण्यात आली. या वाहिनीच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेऊन देशातील या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. काेर इंजिनियरिंग कंपनीच्या माध्यमातून झालेल्या या कामासाठी 450 काेटींचा खर्च करण्यात आला. यात अणुभट्टी 1 च्या कामाला प्राधान्य देण्यात आले. अणुऊर्जा नियामक मंडळाने तपासणी करून ऑक्टाेबर 2025 मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकाेनातून वीजनिर्मितीस ही अणुभट्टी कार्यक्षम असल्याचा दाखला दिला. त्यानंतर अणुभट्टीत इंधन म्हणून युरेनियम साठा भरण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा 30 डिसेंबर 2025 राेजी पूर्ण करण्यात आला.
त्यानंतर 29 जानेवारीला रात्री अणुभट्टी-1 मधून उत्पादित वीज राष्ट्रीय विद्युत ग्रीडला जाेडण्यात आली. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी तांत्रिक कारणांमुळे वीज उत्पादन बंद करण्यात आले.टर्बाइनमधील काही ज्वलनशील पदार्थांमुळे धूर येण्याची घटना घडल्याची शक्यता तारापूर अणुऊर्जा केंद्राचे प्रकल्प संचालक अजय कुमार भाेळे यांनी व्य्नत केली. आवश्यक दुरुस्ती करून पुढील चार-पाच दिवसांत अणुभट्टी-1 मधून वीजनिर्मिती सुरू केली जाईल. अणुभट्टी-2 मधील बहुतांश नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे परीक्षण अणुऊर्जा नियामक मंडळातून हाेऊन त्यानंतर पुढील तीन महिन्यांत या अणुभट्टीमधून 160 मेगावाॅटपर्यंत वीज उत्पादन सुरू करण्याचा निर्धार भाेळे यांनी व्य्नत केला.