पुण्याची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळ : मुख्यमंत्री

05 Feb 2026 22:34:51
 
 

CM 
वेगाने हाेत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरात औद्याेगिकीकरण वाढत आहे.नागरीकरणाचा वेगही गतिमान आहे.अशा स्थितीत भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विमानतळासाठी भूसंपादन महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून कालमर्यादेत पूर्ण करून विमानतळ विकासाचा माेठा टप्पा पारकरावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
 
‘वर्षा’ निवासस्थानी पुरंदर विमानतळ विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री हाेते. बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, प्रधान सचिव (उद्याेग) पी.अन्बळगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार काैस्तुभ धवसे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू आदी उपस्थित हाेते. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले हाेते.
 
सद्यस्थितीत प्रस्तावित क्षेत्रापैकी 1216 हेक्टर जमिनीची संयु्नत माेजणी पूर्ण करावी. या संयु्नत माेजणीचा, हरकतींचा अहवाल राज्य शासनास सादर करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. पुणे जिल्ह्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी व पारगाव या सात गावांत पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. या गावांत भूसंपादनासाठी गावनिहाय उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी दर्जाचे भूसंपादन अधिकारी नियु्नत करण्यात आले आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
Powered By Sangraha 9.0