कुंभमेळ्याचे परिपूर्ण दस्तावेजीकरण करावे : शेखावत यांची सूचना

    04-Feb-2026
Total Views |
 
 

kumbh 
 
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये हाेणारा सिंहस्थ कुंभमेळा माेठा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे परिपूर्ण दस्तावेजीकरण करावे, असे निर्देश केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिले.शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा, पायाभूत सुविधा व तयारीची आढावा बैठक झाली. त्यावेळी शेखावत बाेलत हाेते. यावेळी राष्ट्रीय महिला आयाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, विभागीय आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता नवनाथ साेनवणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमाेल गाेटे आदी उपस्थित हाेते.कुंभमेळ्यानिमित्त देश-विदेशातून भाविक येतील.
 
त्यांच्यासाठीच्या पायाभूत साेयीसुविधा वेळेत पूर्ण कराव्यात. या कालावधीत माेबाइल नेटवर्क सुरळीत राहण्यासाठी आतापासूनच उपाययाेजना कराव्यात. रामकाल पथासह उर्वरित विविध विकास कामांसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीने सादर करावा. तसेच, त्र्यंबकेश्वरच्या विकास कामांचा समावेश असलेला परिपूर्ण आणि सर्वसमावेशक आराखडा सादर करावा. गर्दी व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियाेजन करावे. भाविकांच्या साेयीसाठी ठिकठिकाणी पाणी उपलब्ध हाेईल, असे नियाेजन करावे. तसेच, भाविकांसाठी हेल्पलाइन सुविधा कार्यान्वित करावी.नाशिकसह जिल्ह्यात धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनाला माेठी संधी आहे. त्यादृष्टीने ब्रॅण्डिग करावे. नाशिक, त्र्यंबकेश्वर हवाई दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध हाेऊ शकतात का याची पडताळणी करावी, अशाही सूचना शेखावत यांनी केल्या.विभागीय आयुक्त डाॅ. गेडाम, कुंभमेळा आयुक्त सिंह, पालिका आयुक्त खत्री यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेली विकास कामे, साधूग्राम, त्र्यंबकेश्वरचा दर्शन पथ, रामकाल पथ, भूसंपादन, बाधितांचे पुनर्वसन याविषयी सविस्तर माहिती दिली.