राज्यात नवीन रक्तपेढी स्थापन करण्यासाठी सार्वजनिक आराेग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यात महानगर क्षेत्रात नवीन रक्तपेढीला वर्षभरात तीन हजार युनिट रक्त संकलन करावे लागणार आहे.आराेग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये भाैगाेलिक वर्गीकरण, स्वेच्छा रक्तदान शिबिरांमधून रक्तसंकलनाची किमान मर्यादा, एनओसी देण्याचे निकष स्पष्ट केले आहेत. त्यामुळे रक्तपेढी स्थापन करू इच्छिणाऱ्या संस्था/ ट्रस्टने स्वेच्छा रक्तदान शिबिरांद्वारे दरवर्षी किमान 3000 युनिट्सपेक्षा अधिक रक्तसंकलन करण्याचे लेखी आश्वासन द्यावे लागेल, तर शहरी, ग्रामीण व आदिवासी भागात नवीन रक्तपेढीसाठी किमान 2000 युनिट्स रक्तसंकलनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. दाेन वर्षांनंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून आढावा घेतला जाईल.
ज्या संस्था/ट्रस्टकडे रक्त घटक विभाजन सुविधा उपलब्ध आहे अशांनाच नवीन रक्तपेढीसाठी एनओसी देण्यात येणार आहे. याशिवाय, प्लेटलेट्सची मागणीपुरवठा तफावत भरून काढण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अफेरेसिस सुविधा असलेल्या रक्तपेढींना प्राधान्य दिले जाणार आहे.रुग्णालयाला रक्तपेढीची परवानगी देण्यापूर्वी संबंधित रुग्णालयातील गरज जवळच्या रक्तपेढीशी संलग्न साठवण केंद्रातून भागवता येतील का, याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. तसेच, खाटांची संख्या, हृदय, मूत्रपिंड किंवा इतर अवयव प्रत्याराेपणासारख्या शस्त्रक्रिया व आपत्कालीन सेवांची उपलब्धता यांचाही विचार केला जाणार आहे. एनओसी मिळाल्यानंतर संबंधित रुग्णालयाला आसपासच्या 3 ते 4 रुग्णालयांना रक्त व रक्त घटक पुरवठा करण्याचे लेखीआश्वासन द्यावे लागेल.
200 किंवा त्यापेक्षा जास्त खाटांची क्षमता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला रक्तपेढीसाठी एनओसी दिली जाईल. सरकारी रुग्णालयांना आराेग्य विभागाच्या गरजेनुसार रक्तपेढी सुरू करता येईल.महानगर, शहरी व ग्रामीण भागात स्वतंत्र रक्तपेढी स्थापनेसाठी एनओसी देताना संबंधित क्षेत्रातील रक्तपेढ्यांचे भाैगाेलिक मॅपिंग केले जाईल. त्यात विद्यमान रक्तपेढ्यांची संख्या व त्यांचे रक्तसंकलन विचारात घेतले जाईल.तसेच, परिसरातील रुग्णालयांची संख्या, रक्ताची गरज व वापर, तसेच विशेष शस्त्रक्रिया व सामान्य शस्त्रक्रियांच्या आधारे अतिरिक्त रक्तपुरवठ्याच्या आवश्यकतेचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.