‘हिंसा, लाेभ, वासना आणि राग ही आजच्या काळातील भारतातील खटल्यांची चार मुख्य कारणे बनली आहेत,’ असे निरीक्षण न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सर्वाेच्च न्यायालयात एका जमीन व्यवहाराच्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान नाेंदवले.‘सध्या भारतातील खटल्यांसाठी चालना देणारी ही चार मुख्य सूत्रे आहेत,’ असे न्यायमूर्ती दत्ता यांनी भर न्यायालयात सांगितले. ते भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठात हाेते. सरन्यायाधीशांनी या निरीक्षणाशी सहमती दर्शवत हे ‘पूर्णपणे सत्य’ असल्याचा उल्लेख केला.‘यमुना एक्सप्रेस वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथाॅरिटी’ने ‘गाैडसन्स मेगा प्राेजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या विरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठ सुनावणी घेत हाेते. हे प्रकरण पूर्वपरवानगीशिवाय जमिनीच्या सब- लीजशी लावण्यात आलेल्या शुल्काशी संबंधित हाेते.
सरकारी अधिकारी आजकाल जमीन कायद्यांच्या उल्लंघनासाठी खासगी बिल्डरांशी हातमिळवणी करत असल्याचे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नाेंदवल्यानंतर, न्यायमूर्ती दत्ता यांनी वरील भाष्य केले.न्यायमूर्ती दत्ता पुढे म्हणाले, ‘कृपया आत्मपरीक्षण करा... लाेभ इतक्या स्तरावर वाढला आहे, की ताे आता आटाेक्याबाहेर गेला आहे. नागरिकांवर आमचे (न्यायालयांचे) काेणतेही नियंत्रण नाही.आम्ही त्यांना हिंसा किंवा लाेभापासून दूर राहण्यासाठी न्यायालयीन आदेश देऊ शकतनाही.’ यावर साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पुष्टी जाेडली की, ‘या चार गाेष्टींना केवळ न्यायालयीन आदेशांनी स्थगिती देता येणार नाही.’ जनहित याचिका : न्यायमूर्ती दत्ता यांनी सकाळी सुनावणीसाठी आलेल्या एका जनहित याचिकेचा देखील संदर्भ दिला. त्या याचिकेत याचिकाकर्त्याने अशी मागणी केली हाेती की, सर्व न्यायालयांनी प्रकरणांचा निकाल एका वर्षाच्या आत द्यावा, जेणेकरून लाेकांना मन:शांती मिळू शकेल. यावर न्यायमूर्ती म्हणाले की, ‘जर तुम्हाला खराेखर मन:शांती हवी असेल, तर तुम्हाला या चार अवगुणांचा त्याग करणे आवश्यक आहे.