
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ध्वजस्तंभाची उंची 51 फूट व 31 फूट राहणार असून, ध्वजस्तंभाचा पाया साधा ठेवण्यात येईल, तर सजावटीचे व प्रतीकात्मक काम स्तंभावर करण्याचा निर्णय येथे झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला.कुंभमेळ्यासाठीचा ध्वजस्तंभ व पताकांच्या रचना व उभारणीबाबत आढावा व नियाेजन बैठक नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयु्नत शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झाली. त्यात ध्वजस्तंभ व पताकांचे नियाेजन, स्थापत्य रचना, साहित्य निवड, उंचीचे निकष, धार्मिक व सांस्कृतिक प्रतीकात्मकता; तसेच कामकाजाच्या नियाेजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.ध्वजस्तंभ हा केवळ भाैतिक संरचना नसून श्रद्धा, सांस्कृतिक वारसा व सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याने त्याची रचना व उभारणी संवेदनशीलतेने व जबाबदारीने करावी, असे यावेळी सूचित करण्यात आले.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे एकसमान रचना राहील यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित नियाेजन व रचनेबाबत सविस्तर सादरीकरण केले.कुंभमेळ्याच्या पाैराणिक महत्त्वाशी निगडित प्रतीकात्मक काेरीव काम, विशेषतः समुद्रमंथनाशी संबंधित संदर्भ ध्वजस्तंभांवर समाविष्ट करण्यात येणार आहेत.नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुराेहित संघांनी ध्वजस्तंभासाठी आध्यात्मिक व धार्मिक रचनात्मक घटक सादर केले. हे घटक स्थापत्य रचनेत समाविष्ट करण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने दाेन्ही पुराेहित संघांशी चर्चा करून अंतिम आराखडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले; तसेच पताकांची रचना संबंधित पुराेहित संघांकडूनच करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.