संध्यानंद.काॅम ‘सर्वाेच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले की, भटक्या श्वानांच्या (कुत्र्यांच्या) हल्ल्यांच्या घटनांसाठी भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांना (डाॅग फीडर्स) जबाबदार धरण्याबाबत न्यायालय गंभीर आहे.’ प्राण्यांसाठी काम करणाऱ्याने न्यायालयाच्या या माैखिक विधानामुळे श्वानप्रेमींवर हल्ले हाेण्यासारखे दुर्दैवी परिणाम हाेऊ शकतात, असा इशारा दिला असतानाही न्यायालयाने आपली भूमिका परत एकदा स्पष्ट केली आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हे भाष्य केले. एका श्वानप्रेमीसाठी बाजू मांडताना वकील प्रशांत भूषण यांनी असे नमूद केले हाेते की, ‘खंडपीठाने यापूर्वी श्वानप्रेमींची जबाबदारी निश्चित करण्याबाबत केलेली टिप्पणी उपराेधिक असावी आणि त्यामुळे तिचा चुकीचा अर्थ काढला जाण्याची शक्यता आहे.’ उपहासात्मक विधान नाही : न्यायाधीश न्यायमूर्ती नाथ यांनी मात्र स्पष्ट केले की, ‘हे निरीक्षण थट्टेने किंवा उपसाहाने केलेले नव्हते.
आम्ही या प्रकरणात काय करू हे अद्याप माहीत नसले तरी, ती टिप्पणी गंभीरपणे केलेली हाेती. सुनावणी दरम्यान झालेल्या चर्चेचा ताे एक भाग हाेता,’ असे त्यांनी सांगितले.यावर भूषण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, न्यायाधीश व वकील यांच्यातील माैखिक चर्चेचे कधीकधी प्रत्यक्षात गंभीर परिणाम हाेऊ शकतात.