माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित व दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित हाेणाऱ्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मंगळवारी (3 फेब्रुवारी) रात्री 8 वाजता हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. या मुलाखतीत समितीचे सदस्य तथा उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांनी या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. शहिदी समागम वर्षानिमित्त 19 फेब्रुवारीस नवी मुंबईत राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास माेठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून, त्या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे पवार यांनी सांगितले.
या शहिदी समागम वर्षाच्या पार्श्वभूमीवर श्रमदान उपक्रमांच्या माध्यमातून सेवाभाव, सामाजिक सलाेखा व स्वच्छतेचा संदेश दिला जाणार असून, युवा पिढीपर्यंत श्री गुरू तेग बहादूर साहिबजींचे विचार, त्याग आणि मानवतावादी मूल्ये पाेहाेचवण्यासाठी शासनामार्फत विविध जनजागृती, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली आहे. श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी राष्ट्र, धर्मस्वातंत्र्य आणि सांस्कृतिक मूल्यांच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वाेच्च बलिदानाचे महत्त्व पवार यांनी सांगितले आहे.त्यांच्या त्यागातून मानवतावाद, सहिष्णुता आणि सामाजिक ऐक्याचा जाे संदेश मिळताे, ताे आजच्या काळात अधिकच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी या मुलाखतीतून सांगितले. ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमांवरही प्रसारित करण्यात येईल. निवेदिका डाॅ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.