येथील विमानतळावर एप्रिलपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक उपकरणांच्या उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. विदर्भातील महत्त्वाचे शैक्षणिक आणि व्यापार केंद्र असलेल्या अमरावतीतून विमान वाहतुकीला चालना मिळू शकणार आहे.सध्या बेलाेरा विमानतळावरून अमरावती ते मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू आहे. या सेवेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.प्रवाशांची वाढती संख्या पाहता अमरावती विमानतळात माेठी व्यावसायिक क्षमता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता विमानतळाचा विस्तार आणि सुविधांच्या अद्ययावतीकरणावर भर दिला जात आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या पथकाने नुकतीच विमानतळाची पाहणी करून बांधकामाला मान्यता दिली आहे. मार्चमध्ये हाेणाऱ्या अंतिम चाचणीनंतर नियमित रात्रीची उड्डाणे सुरू हाेण्याची शक्यता आहे.संपूर्ण यंत्रणा उभारण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागू शकताे. यात काेणतीही त्रुटी राहू नये यासाठी चाचणी घेतली जाते. तंत्रज्ञांना ही यंत्रणा पूर्णपणे इन्स्टाॅल झाल्याची खात्री पटल्यानंतर तिची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे.सध्या अमरावतीकरांना दिल्ली, काेलकाता, अहमदाबाद किंवा बंगळुरू या शहरांत जाण्यासाठी रस्ते मार्गाने नागपूर विमानतळावर जावे लागते. मात्र अमरावती विमानतळावर नाईट लँडिंग सुरू हाेताच या प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग माेकळा हाेणार आहे.यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. मुंबई विमानसेवेला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहून पुणे आणि हैदराबादसाठीचे प्रस्ताव आधीच अंतिम टप्प्यात आहेत.