फूड फार्मर (यातलं फार्म या शब्दाचं स्पेलिंग फार्मसीमधल्या फार्मचं आहे) या नावाने अन्नपदार्थांच्या घटकांचं विश्लेषण करणारा तरुण मुलगा फारच लाेकप्रिय झालेला आहे.नामवंत कंपन्या आपल्या उत्पादनांच्या लेबलांमध्ये कशा थापा मारतात, नावांमध्ये, जाहिरातींमध्ये कसे भलतेच दावे करतात आणि प्रत्यक्षात त्यांच्या उत्पादनात काय असतं, याचा पर्दाफाश ताे करताे. किसान जॅम हा जॅम सगळ्यांच्या परिचयाचा. घराघरात ताे काही काळ असताेच.हा काळ असताे मुलं लहान असण्याचा. मिक्स्ड फ्रूट जॅम म्हणून विकल्या जाणाऱ्या या जॅमवर नानाविध फळांचं आकर्षक चित्र असतं.
मुलं लहान असताना त्यांना बटरटाेस्ट आणि जॅम टाेस्ट किंवा जॅम बटर टाेस्ट देताना पालकांना वाटतं की आपण मुलांना कमालीचं पाैष्टिक असं काहीतरी देताेय. प्रत्यक्षात तसं नसतं. या जॅमच्या बाटलीवरच्या रॅपरवरची घटक पदार्थांची यादी वाचली की लक्षात येतं की आपण मुलांना फक्त साखरच खायला घालताे आहाेत.एकीकडे आपण प्रचंड साखर असते म्हणून मुलांना काेल्ड्रिंक प्यायला मनाई करताे, त्यापेक्षा अधिक साखर असलेलं च्यवनप्राश मात्र मुलांना दाेन वेळा खायला लावताे.जॅम टाेस्टवर लावून देताे.या जॅममध्ये खराेखरची फळं किंवा त्यांचा गर याचा भाग किती किरकाेळ असताे, ते पाहिलं तर मेंदू चक्रावून जाईल.