ठाणे, 22 फेब्रुवारी (आ.प्र.) : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक नाणेघाट परिसरात आता वनवासी संस्कृतीचा ठेवा जपणारे भव्य संग्रहालय साकारण्यात येणार आहे.
नाणेघाट प्रवेशद्वाराजवळ वन विभागाच्या भूमाता वनधन विक्री केंद्राचे रूपांतर निसर्ग संवाद संस्कृती या नावाच्या सुसज्ज सांस्कृतिक दालनात करण्यात येणार असून, यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने 65.50 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या उपक्रमामुळे सध्याच्या लहानशा विक्री केंद्राला व्यापक स्वरूप प्राप्त हाेऊन ते एक समृद्ध लाेकसंस्कृती संग्रहालय म्हणून विकसित हाेणार आहे.
ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या ग्रामीण भागाला माेठी संस्कृती आहे. मुरबाड, शहापूरसारख्या ठिकाणी माेठ्या प्रमाणात आदिवासी नागरिक वास्तव्यास आहेत. गेल्या काही वर्षांपासून काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तेथे लहान स्वरूपात लाेकसंस्कृती संग्रहालय चालवण्यात येत हाेते. आता शासनाच्या निधीमुळे या प्रयत्नांना बळ मिळून या दालनाचा विस्तार आधुनिक संकल्पनेत केला जाणार आहे.
पर्यटनासाठी नाणेघाटाला भेट देणाऱ्या पर्यटकांना तेथील वनवासी समाजाचे जीवन, परंपरा, भाषा आणि सांस्कृतिक वारशाचा सखाेल परिचय व्हावा, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे.
मुरबाड तालुक्यातील अश्वमेध प्रतिष्ठान, श्रमिक मु्नती संघटना आणि वननिकेतन या संस्थांनी वनवासी संस्कृतीचे जतन करणारे दालन उभारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सह्याद्रीच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या जीवनपद्धतीत शेती, मासेमारी, हस्तकला, देवपरंपरा आणि दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये माेठे वैविध्य दिसून येते. ही समृद्ध परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पाेहाेचावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.