सूर्यघर वीज याेजनेत पुरवठादारांचा आराेप चुकीचा

    23-Feb-2026
Total Views |
 
solar Rooftop Subsidy
 
मुंबई, 22 फेब्रुवारी (आ.प्र.) : प्रधानमंत्री सूर्यघर माेफत वीज याेजनेत घराच्या छतावर साैर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवण्याच्या क्षमतेच्या बाबतीत महावितरणने निर्बंध लादल्याचा साैरऊर्जा प्रकल्प पुरवठादारांचा आराेप चुकीचा आहे. अधिक क्षमतेची रास्त गरज असलेल्या ग्राहकांना महावितरणकडून तपासणीनंतर मंजुरी देण्यात येत आहे.
 
सामान्य घरगुती ग्राहकांसाठी केंद्राने सुरू केलेल्या या याेजनेत पुरवठादारांच्या दबावामुळे ग्राहकांचे नुकसान हाेऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात येत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
 
ही याेजना सामान्य घरगुती ग्राहकांसाठी आहे. तथापि, नियमित घरगुती वीजपुरवठ्याच्या गरजेपेक्षा खूप जास्त क्षमतेचा साैरऊर्जा प्रकल्प बसवायचा, केंद्राकडून अनुदान घ्यायचे, नंतर त्या कनेक्शनचे रूपांतर वाणिज्यिक कनेक्शनमध्ये करून अनुदानाचा गैरफायदा घ्यायचा, असे प्रकार घडल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे.
 
ग्राहकांचा विजेचा वापर कमी असल्याने त्यांची एक किंवा दाेन किलाेवाॅटच्या प्रकल्पाची गरज असताना पुरवठादारांकडून त्यांच्यावर अधिक क्षमतेचा प्रकल्प बसवण्यासाठी दबाव आणण्यात येत असल्याच्या तक्रारी महावितरणकडे आल्या आहेत.
 
त्यामुळे गरज नसताना संबंधित घरगुती ग्राहकांवर प्रकल्पाच्या खर्चाचा बाेजा पडताे. हे ध्यानात घेऊन महावितरणने ग्राहकांचा प्रत्यक्ष विजेचा वापर किती आहे हे ध्यानात घेऊन त्यानुसार स्वयंचलित व्यवस्थेत विजेच्या मंजूर भाराला (लाेड) मान्यता देण्याची व्यवस्था केली. त्यानुसार त्या ग्राहकाला साैर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवता येताे. तथापि, ग्राहकाच्या नियमित वीजवापरापेक्षा खूप जास्त क्षमतेचा साैरऊर्जा प्रकल्प बसवण्याची मागणी आली तर महावितरणकडून ती मंजूर केली जाणार नाही, तर त्यासाठी महावितरणच्या यंत्रणेकडून तपासणी करून रास्त मागणी असल्याचे स्पष्ट झाल्यावर मंजुरी देण्यात येईल. काही कारणाने ग्राहकाला अधिक क्षमतेचा प्रकल्प बसवण्याचे गरजेचे वाटल्यास प्रत्यक्ष खात्री केली जाईल. त्यानंतर त्या ग्राहकांना अधिक क्षमतेचे प्रकल्प बसवण्यास परवानगी दिली जाईल.
 
यासाठी महावितरणच्या व्यवस्थापनाने संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत.