नाशिक, 22 फेब्रुवारी (आ.प्र.) : कुंभमेळ्यात काेट्यवधी भाविकांच्या गर्दीतील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित 4011 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि 18 टेहळणी ड्राेनचे विशाल नेटवर्क तयार करण्यात येत आहे. या नव्या प्रारूपाद्वारे चित्रीकरणाचे रिअलटाइम विश्लेषण करून महत्त्वाच्या घटनांची ओळख पटवली जाईल, जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीने माणसांची हालचाल, गर्दीचे व्यवस्थापन, संशयास्पद घटना आणि वाहतूक नियंत्रण आदी बाबी साध्य केल्या जाणार आहेत.
नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्यात सहा ते सात काेटी भाविक सहभागी हाेण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे कुंभमेळ्यात गर्दीचे व्यवस्थापन हे यंत्रणांसमाेरील सर्वांंत माेठे आव्हान आहे. 2003-04 मधील कुंभमेळ्यात नाशिकमध्ये शाही मिरवणुकीवेळी चेंगराचेंगरी हाेऊन 30 भाविकांना प्राण गमवावे लागले हाेते. 2015 मधील कुंभमेळ्यात दक्षता घेतल्याने काेणतीही दुर्घटना घडली नाही. आगामी कुंभमेळ्यासाठी आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व ड्राेनची मदत घेण्यात येणार आहे.
एकूण 4011 कॅमेऱ्यांपैकी तीन हजार कॅमेरे नाशिक शहरात, तर 700 कॅमेरे त्र्यंबकेश्वरमध्ये बसवले जातील.
उर्वरित कॅमेरे वाहनतळ आणि गर्दी हाेऊ शकणाऱ्या अन्य ठिकाणी बसवले जाणार आहेत. या प्रणालीचे नुकतेच त्र्यंबकेश्वरमध्ये प्रात्यक्षिक पार पडले.
या माध्यमातून प्रणालीची कार्यक्षमता, विश्लेषणातील अचूकता आणि समन्वय क्षमता तपासण्यात आली.
त्र्यंबकेश्वर येथील मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार, उत्तर व गायत्री दरवाजा, पाेलीस ठाण्याचा परिसर; तसेच मुख्य रस्त्यांवर विविध प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गर्दीवर देखरेख व व्यवस्थापन करण्यात आले. प्रणालीने भाविकांची उच्च घनता ओळखून सतर्कतेचे संदेश दिले. यात त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन रांगेच्या व्यवस्थापनाचाही समावेश हाेता. या प्रणालीची चेहरा ओळखणे, अनधिकृत प्रवेश, आग व धूर शाेधणे आणि अनुचित प्रकार शाेधणे आदी क्षमता आहे. चाचणीवेळी प्रणालीने अशा घटना निदर्शनास आणून दिल्या.