मुलांच्या परीक्षेच्या काळात पालकांसाठी टिप्स

    23-Feb-2026
Total Views |
 
parenting tips
 
मुलाला अपयश येईल, या भीतीने स्वतः चिडचिडेपणा करू नका.
तज्ज्ञांच्या मते, व्यायाम करा, सकस आहार घ्या आणि पालकांचे स्पर्धेच्या गाेष्टी करणारे व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुप्स बंद करा. मुलांना सहानुभूतीपूर्ण प्रश्न विचारा. यामुळे मुलामध्ये आत्मविश्वास टिकवून ठेवण्यास मदत हाेते.
 
संध्यानंद.काॅम
 
भारतातील घरांमध्ये सध्या एक वेगळीच शांतता पसरली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई बाेर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा सुरू झाल्यामुळे देशातील लाखाे घरांमध्ये ही शांत परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरवाजे हळूच लावले जात आहेत, घरात हाेणाऱ्या गप्पा कमी झाल्या आहेत आणि फॅमिली व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुप्समध्ये जणू स्पर्धाच सुरू आहेत. मुले परीक्षा देत आहेत, पण पालकच अनेकदा जास्त तणावात दिसत आहेत. मुले शांतपणे अभ्यास करतात, पण अनेकदा पालक, त्यांचे मित्र, नातेवाईक आणि अगदी ड्रायव्हरसुद्धा मुलांच्या मार्कांबद्दल विचारून अप्रत्यक्ष मानसिक दडपण निर्माण करत असतात.
 
घरातील वातावरणाचा परिणाम :
 
2023 मध्ये कर्नाटकात झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, 86% किशाेरवयीन मुले स्पर्धात्मक परीक्षेच्या दडपणामुळे तीव्र मानसिक तणावाखाली असतात, तर 87% पालकांनी मान्य केले की, त्यांना या काळात प्रचंड मानसिक दडपण जाणवते. हे सर्वेक्षण स्पष्ट करते की, घरातील वातावरण मुलांच्या मानसिक आराेग्यावर थेट परिणाम करते.
 
तज्ज्ञांचे मत :
 
मुंबईतील समुपदेशक मैथिली थानवाला कानबार सांगतात की, ‘बहुतेक पालकांमध्ये या काळात भविष्याची भीती आणि मुलांना वेळ न देता आल्याची अपराधीपणाची भावना असते.
 
त्यांना वाटते की आपल्या मुलासाेबत काही वाईट घडेल का, त्यांना कमी मार्क मिळतील का? जरी पालक काही बाेलले नाहीत तरी मुले त्यांच्या देहबाेलीवरून हा तणाव ओळखतात.’ नाेएडा येथील मानसशास्त्रज्ञ आभा सिंह म्हणतात की, ‘परीक्षेचा काळ पालकांना नकळत एक कायम सतर्क असलेला पहारेकरीच बनवताे, ज्यामुळे घर जणू एक छाेटे परीक्षा केंद्रच वाटते.’ पालकांचा अनुभव : तणावाचे हे हस्तांतरण काैटुंबिक आहे. 43 वर्षीय तन्वी पटेल यांचा अनुभव सांगताे की, जेव्हा त्यांनी मुलाला अभ्यास करण्यावरून टाेकणे बंद केले, तेव्हा घरातील वातावरण सुधारले. त्या म्हणतात, ‘मी स्वतःला सतत मुलावर नजर ठेवताना पाहत हाेते - ताे किती वेळ अभ्यास करताेय, नीट खाताेय की नाही. मला जाणवले की मी त्याला मदत करण्याऐवजी त्रास देत हाेते. जसजसा मी माझा त्याला हाेणारा त्रास कमी केला, तसा ताे जास्त मनापासून अभ्यास करू लागला.’ पालकांनी स्वतःच्या वागण्यात बदल करणे आवश्यक आहे. मुलाच्या पहाऱ्यावर तासन्तास बसून राहण्याऐवजी, अधूनमधून त्याची विचारपूस करा. ‘तुझी अभ्यासाची तयारी कशी सुरू आहे, तुला अभ्यासात काही मदत हवी आहे का?’ असे विचारा किंवा ‘या आठवड्यात तुला कसे वाटते? तुला आणखी काेणाची मदत हवी आहे का?’ असे सहानुभूतीपूर्ण प्रश्न विचारा. यामुळे मुलाला आपला स्वाभिमान व आत्मविश्वास टिकवून ठेवण्यास मदत हाेते.
 
चहा-बिस्किटांचा सापळा : बहुतेक पालक मुलांना अभ्यासाच्या वेळी चहा आणि बिस्किटे देतात. पण क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट हिमानी जरीवाला सांगतात की, हे चुकीचे आहे. चहा-बिस्किटांमुळे काेर्टिसाेल पातळी वाढते, ज्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा वाढताे आणि वारंवार चहा पिण्याची इच्छा निर्माण हाेते. दिवसातून फार तर दाेन वेळा चहाकाॅफी घेणे याेग्य आहे. त्याऐवजी तुळशीचा चहा, किंवा पुदिना चहा, राेटी, चाट व त्यासाेबत सकस आहार देणे अधिक फायदेशीर ठरते. मुलांना ठराविक वेळी खायला दिल्याने व एक जेवण एकत्र केल्याने त्यांचा ताण कमी हाेताे.

शारीरिक हालचाली : फिजियाेथेरपिस्ट स्नेहा शाह सांगतात की, ‘पालकांनीही स्वतः च्या आराेग्याकडे लक्ष दिले पाहिजे. तासन्तास एका जागी बसल्यामुळे पाठदुखी आणि मानदुखी वाढते, मुलांना ते समाजात नाही व ते पालकांचे अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी दर अर्ध्या तासाने स्ट्रेचिंग करणे किंवा थाेडा वेळ चालणे आवश्यक आहे. अभ्यासात तासनतास बुडालेल्या मुलांना अधूनमधून असा ब्रेक देणे उपयुक्त ठरते.’ याेग प्रशिक्षक अनुप शहा सुचवतात की, ‘5 मिनिटे शांतपणे बसून श्वासाेच्छ्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मज्जासंस्थेला आराम मिळताे. अतिउत्साही नातेवाईक किंवा पाहुण्यांनी दिलेल्या उदाहरणाशी तुलना करून, मुलांच्या डाेक्यावर बसणे पालकांनी साेडून द्यावे.’ महत्वाचे : शेवटी, पालकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, की प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते. गुणांपेक्षा त्यांच्या कष्टाचे काैतुक करणे महत्त्वाचे आहे. घरातील वातावरण शांत ठेवल्याने मुले अधिक चांगला अभ्यास करू शकतात आणि त्यांचे निकालही सुधारतात. मुलांना त्यांच्या अभ्यासात एखाद्या वाॅचमनची नाही तर एका मार्गदर्शकाची गरज असते. मार्कांपेक्षा प्रयत्नांना शिक्षणतद्न्यही अधिकचे महत्त्व देतात आणि ज्या घरांमध्ये एक समन्वय साधला जाताे, त्या मुलांच्या परीक्षेचा रिझल्ट नेहमीच अपेक्षेपेक्षा चांगला लागताे.