अंतराळातून पाहिल्यावर देश, शहर किंवा सीमांची ओळख मागे पडते आणि पृथ्वी हीच आपली ओळख वाटते, अशी भावना अंतराळातून पृथ्वीकडे पाहताना निर्माण झाल्याचा अनुभव भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा व नुकतेच अंतराळ स्थानकावर जाऊन आलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी सांगितला. या दाेन्ही अंतराळवीरांनी यावेळी विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनशैलीचाही संदेश दिला.भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये अवकाश, पर्यावरण आणि मानवी जबाबदारीचा अनाेखा संगम अनुभवायला मिळाला. देशाचे दाेन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू शुक्ला सारे जहाँ से अच्छा या विशेष सत्रात प्रथमच एका मंचावर एकत्र आले. क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते दाेघांचा सत्कार करण्यात आला. विविध शाळांतील 150हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेत अवकाशवीरांशी थेट संवाद साधला. ज्येष्ठ पत्रकार गाैरव सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून पृथ्वी पाहताना आलेल्या अनुभूती सांगताना प्रदूषणाचे गंभीर परिणामअधाेरेखित केले. पृथ्वीचा निळसर रंग कमी हाेत करडेपणा वाढल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. हा केवळ दृश्य बदल नाही, तर आपल्या पर्यावरणीय स्थितीचे स्पष्ट संकेत आहेत, असे ते म्हणाले. अंतराळातून पाहिलेल्या जंगलाच्या आगी, धुराचे प्रचंड ढग व पसरलेले प्रदूषण यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक कृती जागतिक परिणाम घडवते हे स्पष्ट हाेते, असे त्यांनी नमूद केले.सचिन तेंडुलकर म्हणाले, ‘राइट नाऊ असं काही नसतं, राइट असतं आणि नाऊ असतं. तुम्ही गाेष्ट आत्ता करू शकता किंवा याेग्य प्रकारे करू शकता. दाेन्ही एकत्र नेहमीच शक्य नसतात. आजच्या वेगवान, तत्काळ परिणामांच्या युगात संयम, तयारी आणि सातत्य यांचे महत्त्व आहे. हवामान बदलासारख्या गंभीर प्रश्नावर काम करताना प्रत्येक छाेटा प्रयत्न महत्त्वाचा आहे.’