ऑनलाइन साइट 5 आमिष दाखवून ग्राहकांना लुटतात

    21-Feb-2026
Total Views |
 
 

online 
एका गर्भवती महिलेला काही महिन्यांत बाळ हाेणार हाेते. तिच्या पतीने लहान मुलांच्या उत्पादनांची - पालन, डायपर, कपडे आणि इतर वस्तूंची माहिती शाेधण्यासाठी ऑनलाइन शाेध सुरू केला. काही तासांतच, त्याने भेट दिलेल्या प्रत्येक वेबसाइटने त्याच्यावर डायपरच्या जाहिरातींचा भडिमार सुरू केला. त्याच्या काही नातेवाइकांना कळण्यापूर्वीच त्याच्या फाेनला कळाले हाेते की ताे ‘बाबा’ हाेणार आहे.काही दिवसांपूर्वी, एका व्यक्तीने दाेन पुस्तके ऑर्डर केली. अमेझाॅनच्या तुमच्यासाठी शिफारस केलेल्या (सजेशन्स) विभागाने त्याला आणखी तीन पुस्तकांची आकर्षक शीर्षके दाखवली.ती सर्व पुस्तके विकत घेतली, मग लक्षात आले की, ती किमान पुढचे चार महिने तरी वाचून पूर्ण हाेणार नाहीत. ती नंतर सहज खरेदी करता आली असती, पण त्या सजेशन्सने त्या व्यक्तीला अडकवले हाेते.पाच घातक शस्त्रे, जी अशी अ‍ॅप्स आपल्या खिशातून पैसे काढून घेण्यासाठी 24 तास व आठवड्याचे सातही दिवस आपल्या स्मार्टफाेनमध्ये काम करत असतात.
 
1. कमतरतेचा भास : ‘या किमतीत फक्त 2 शिल्लक आहेत’, ‘सेल 11 मिनिटांत संपत आहे.’ आपण पेज रिफ्रेश केल्यावर टायमर अनेकदा पुन्हा सुरू हाेताे. ही वैशिष्ट्ये म्हणजे सिद्ध झालेले वर्तणुकीचे ट्रिगर्स आहेत. 2019 मध्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी आणि शिकागाे युनिव्हर्सिटीने 11,000 हून अधिक शाॅपिंग वेबसाइट्सच्या ऑडिटमध्ये खाेट्या कमतरतेच्या आणि घाईच्या संकेतांचा माेठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे नाेंदवले आहे, जे फाेनधारकांना खरेदीपूर्वी विचार करायची संधीच देत नाहीत. माणसाचे वर्तणूकशास्त्र आपल्याला सांगते की, पैसे भरण्याच्या वेदनेपेक्षा काहीतरी गमावण्याची भीती जास्त असते. अ‍ॅप्स नेमका याचाच फायदा घेतात. टायमर उद्या पुन्हा सुरू हाेणार आहे की नाही हे महत्त्वाचे ठरत नाही.
 
2. बक्षीस किंवा लाॅटरी : पेमेंट आणि मनी अ‍ॅप्स पेमेंटला ‘स्लाॅट मशीन’मध्ये बदलतात. आकर्षित करणारे स्क्रॅच कार्ड्स, माेहात टाकणारे कॅशबॅक, जमा करायचे काॅइन्स, मिस्ट्री ड्राॅप्सच्या अपेक्षेने ग्राहक खरेदी करताे, ही वैशिष्ट्ये थेट कॅसिनाेच्या मानसशास्त्रातून घेतली आहेत.‘व्हेरिएबल-रेशिओ रिवाॅर्ड शेड्यूल’ संकल्पनेमध्ये, बक्षिसे अनपेक्षितपणे येतात, ही तीच यंत्रणा आहे जी जुगारांना स्लाॅट मशीनशी खिळवून ठेवते. माणसाचे वर्तणूक संशाेधन दाखवते की मधूनमधून मिळणारे, अनपेक्षित रिवाॅर्ड्स खात्रीशीर रिवाॅर्ड्सपेक्षा खूप जास्त डाेपामाइन वाढवतात. तुम्हाला मिळणारे ते 3 रुपये कॅशबॅक हा त्या अ‍ॅपचा उदारपणा नाही, ते एक सूक्ष्म ट्यून केलेले मानसिक आमिष आहे.
 
3. साेशल प्रूफचा भडिमार : ‘तुमच्या साेसायटीतील राजेशने नुकताच हा साेफा खरेदी केला’, ‘18,472 लाेक आता हे हाॅटेल पाहत आहेत’, हा आपल्याला खरा पुरावा वाटताे. माणूस हा सामाजिक प्राणी समूहाने राहणारा आहे. जेव्हा आपण इतरांना काहीतरी करताना पाहताे, तेव्हा आपण गृहीत धरताे की ते सुरक्षित किंवा स्मार्ट असेल. हे ‘साेशल प्रूफ’ आहे, जे वर्तणूक शास्त्रज्ञांनी नाेंदवल्यानुसार मन वळवणाऱ्या सर्वात शक्तिशाली साधनांपैकी एक आहे.एका आंतरराष्ट्रीय संस्थेचा 2022 चा डार्क पॅटर्नवरील अहवाल नमूद करताे की, अनेक प्लॅटफाॅर्म वापरकर्त्यांना निर्णयांकडे नेण्यासाठी साेशल प्रूफचा प्रभावी वापर हाेताे, कधी कधी ते अति हाेते. जर संख्या अचूक असेल किंवा नसेल, तरीही तुमचा मेंदू कुजबुजताे - जर प्रत्येक जण हे घेत असेल, तर तुम्हीही घेतलेले बरे!
 
4. डिफाॅल्ट्स आणि स्नतीचे ऑप्ट-इन्स : आधीच निवडलेल्या पर्यायाची ताकद खरेदीला भाग पाडते.‘कार्ड तपशील सेव्ह करायचे’, ‘सबस्क्राइब करा आणि बचत करा’, ‘सर्व नाेटिफिकेशन्सना अनुमती द्या’, ज्यामध्ये ‘अनुमती द्या’ बटण हा एकमेवखरा पर्याय असल्यासारखे ठळकपणे हायलाइट केलेले असते.डिफाॅल्ट्स हे वर्तणूक अर्थशास्त्रातील सर्वात मजबूत प्रभावांपैकी एक आहेत.लाेक आधीच निवडलेले पर्याय स्वीकारतात कारण निवड रद्द करण्यासाठी प्रयत्न, वेळ आणि विशेष लक्ष द्यावे लागते. अ‍ॅप्स सर्वात फायदेशीर निवडीला ‘डिफाॅल्ट’ म्हणून सेट करून याचा फायदा घेतात - मग ते तुमचे पेमेंट डेटा सेव्ह करणे असाे, ऑटाे-रिन्यूअल सक्षम करणे असाे किंवा प्रमाेशनल अलर्ट सुरू करणे असाे. स्वतःचा वाटणारा निर्णय, प्रत्यक्षातपूर्व-यांत्रिकी पद्धतीनेच घेतलेला असताे.
 
5. आता खरेदी करा, नंतर पैसे द्या : विलंबाने हाेणाऱ्या वेदनेचे तंत्र ‘तीन महिन्यांत पैसे द्या’, ‘झीराे-काॅस्ट ईएमआय’ अशा वाक्यांनी उत्तेजित हाेते. बीएनपीएल (बाय नाउ पे लॅटर) हे केवळ आर्थिक उत्पादन नाही. ते एक वर्तणुकीला प्रेरित करणारे सूत्र आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरनी सार्वजनिकरीत्या इशारा दिला आहे की, सुलभ क्रेडिट आणि बीएनपीएल माॅडेल्स तरुण भारतीयांमध्ये बचत कमी करत आहेत, आवेगातून खर्च करण्यास प्राेत्साहित करत आहेत आणि पैसे व्यवस्थापन व बचतीच्या सवयी बिघडवत आहेत. जेव्हा पेमेंट लांबणीवर पडते, तेव्हा पैसे भरण्याची वेदना कमकुवत हाेते. तुम्हाला कर्ज वाढत असल्यासारखे वाटत नाही.तुम्हाला स्मार्ट वाटत असते, मात्र हे भ्रम महाग पडतात.