तुमच्यापैकी एकाने पालक म्हणून घरी राहणे आवश्यक आहे का? तुम्हांला दाेघांनाही पूर्णवेळ करिअर-नाेकरी करायची आहे का? असे असेल तर मग तुम्ही अपत्याला पाळणाघरात ठेवणार की तुमच्याकडे बाळाला सांभाळण्यासाठी आजीआजाेबा आहेत? किंवा कुटुंबातील कुणी दिवसभर बाळाची देखभाल करू शकते का? त्याचबराेबर तुमचे आंतरधर्मीय लग्न असेल तर कुठल्या धर्माप्रमाणे मुलावर संस्कार करणार किंवा निखळ भारतीय म्हणून त्याला वाढवणार याबद्दलही चर्चा व्हायला हवी.
लग्नानंतर नव्या शहरात किंवा वेगळ्या राज्यात जावे लागणार का?: अनेकदा नाेकरीव्यवसाय किंवा परवडणारे घर, जीवनशैली यासाठी अनेकांना दुसऱ्या शहरात, राज्यात जावे लागते.काहीवेळा नाेकरीची गरज म्हणून बदल्या हाेत असतात. काहीवेळा नाेकरी बदलल्यामुळे दुसऱ्या शहरात राहायला जाण्याची वेळ येते. या शक्यता लक्षात घेऊन जाेडीदाराशी बाेला. त्याची/तिची यासाठीची मानसिक तयारी आधीपासून असल्यास नंतर ार अडचणी येत नाहीत. अगदी भविष्यात उपनगरात किंवा विस्तारीत शहराजवळील वाढणाऱ्या गावांमध्ये राहण्याची वेळ येऊ शकते.
जगण्यातील प्राधान्यक्रम: लग्नबंधनात अडकणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीबराेबर दीर्घकाल राहण्याची तयारी करणे आणि त्यासाठीचे नियाेजन करणे. लग्न झाल्यावर काैटुंबिक जबाबदाऱ्या, आईवडिलांचा सांभाळ, अपत्यप्राप्ती, त्यांचे पालनपाेषण, घर-कार व इतर माेठी खरेदी, हाैसमाैज, सहली अशा अनेक गाेष्टींचा विचार करावा लागताे. त्यात कुठल्या गाेष्टी प्राधान्याने करायच्या, स्वतःच्या इच्छा, नातेवाईकांचे मन, आईवडिलांचा आदर या सगळ्या गाेष्टींचे तारतम्य पाळावे लागते.सगळ्या गाेष्टींचे संतुलन साधण्याचे काैशल्य असावे लागते. याबाबत दाेघांनी आधीच विचार करून कुठे तडजाेड करायची, कुठे आपल्या मनासारखे घडवून आणायचे, कुठे वाट पाहायची हे ठरवावे लागते.
वयाेवृद्ध पालक: आईवडिल आणि वृद्धपकाळानुसार त्यांच्या गरजा हे लक्षात घेऊन दाेघांना नियाेजन करावे लागते. अलीकडच्या काळात पत्नीच्या आईवडिलांची काळजी हा देखील स्वाभाविकपणे महत्त्वाचा मुद्दा असताे. त्यांची काळजी कशा प्रकारे घ्यायची याचाही विचार लग्नाआधी करणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही नाेकरीव्यवसायासाठी दुसऱ्या शहरात राहणार असाल तरी देखील त्यांचा विचार करावा लागताे. अनेकदा याबाबतीत भावंडांचा विचार घ्यावा लागताे.या सगळ्या बाबी तुम्ही लग्नाआधी परस्परांशी पारदर्शकपणे बाेलणे हिताचे ठरते.
कठीण प्रश्नांना सामाेरे जाताना: तुमच्या आयुष्यातील वाईट काळ काेणता आणि त्यातून तुम्ही कसा मार्ग काढला हे स्वतःला विचारा. संसार करताना अनेक अवघड समस्यांचा सामना करावा लागताे. कठाेर निर्णय घेण्याची वेळ येते. अशा वेळी तुम्ही कशा पद्धतीने विचार करता हे महत्त्वाचे असते. तुमची विचार करण्याची पद्धती माहित असेल तर तुमच्या निर्णयाविषयी जाेडीदाराला धक्का बसत नाही. मुळात कठीण परिस्थितीत परस्परांनी एकमेकांशी संवाद ठेवून निर्णय घेत गेले पाहिजे.
राजकीय विचार: हल्लीच्या बदलत्या जगात मुली स्वतंत्रपणे राजकीय विचार करू लागल्या आहेत. त्यामुळे दाेघांचे राजकीय विचार एकच असतील असे नाही. दाेघांचा राजकीय विचार एकच असावा असे वाटत असेल तर चर्चा करून तुम्हांला निर्णय घ्यावा लागेल. समजा विराेधी राजकीय विचार असतील तरी एकत्र संसार करण्यास काही अडचण येणार नाही असे वाटत असेल तर पुढे जाण्यास काहीच हरकत नाही.