मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक काेंडी दूर करून अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेकविध रस्ते प्रकल्प राबवले जात आहेत. एमएमआरला माेठा समुद्रकिनारा लाभला असून, वाहतूक काेंडीचा प्रश्न साेडवण्यासाठी जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे.त्यानुसार एमएमआरमध्ये नवीन 10 मार्गांवर जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेऊन यासाठी सविस्तर आराखड्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम आता अंतिम टप्प्यात असून, लवकर सल्लागार कंपनीकडून आराखडा सागरी मंडळाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून एमएमआरमधील 10 जलमार्गांवर जल मेट्राे सुरू केली जाणार आहे.
सागरी मंडळाकडून सध्या 21 मार्गांवर जल वाहतूक चालवली जाते. एकूण 85 कि.मी.चे हे 21 जलमार्ग आहेत. जल वाहतूक ही अतिजलद वाहतुकीचा एक पर्याय आहे. एमएमआरला माेठा समुद्र लाभला आहे. त्यामुळे एमएमआरमधील वाहतूक काेंडी दूर करण्यासाठी आणि जल वाहतुकीचा अतिजलद पर्याय उपलब्ध करण्यासाठी सागरी मंडळाने आणखी नवीन 10 जलमार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या नवीन 10 जलमार्गांचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी मेसर्स काेची मेट्राे लिमिटेड या कंपनीची सल्लागार म्हणून नियु्नती करण्यात आली आहे. दरम्यान, या जलमार्गांचा आधी व्यवहार्यता तपासणी अहवालही पूर्ण करण्यात आला आहे. त्यानंतर सविस्तर आराखड्याचे काम हाती घेण्यात आले हाेते.
आता सविस्तर आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सागरी मंडळाने दिली. आराखडा पूर्ण करून येत्या काही दिवसांतच ताे सागरी मंडळाला सादर केला जाईल. हा आराखडा सादर झाल्यानंतर हे 10 जलमार्ग नेमके कसे असणार, त्यावर काेणत्या प्रकारच्या जल मेट्राे धावणार, त्यासाठी किती खर्च येणार यासह अनेक बाबी स्पष्ट हाेतील.आराखडा अंतिम झाल्यानंतर 10 जलमार्गांवर जल मेट्राे सुरू करण्याच्या दृष्टीने नियाेजन करण्यात येणार असल्याची माहिती सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांनी दिली. मुंबई, मिरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण व ठाणे या ठिकाणी हे 10 जलमार्ग असणार आहेत.