नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने कुंभमेळ्यासाठी जाेरदार नियाेजन सुरू असून, अमृत स्नानाच्या दिवसांत आपत्कालीन स्थितीसाठी नदी घाटाशेजारीच ऑनसाइट आयसीयू असणार आहे. त्याचप्रमाणे घाटांवर; तसेच भाविक आल्यानंतर त्यांच्या पार्किंगच्या ठिकाणी आणि हाेल्डिंग एरियात एकूण 51 तंबू दवाखाने असणार आहेत.महापालिकेने कुंभमेळ्याच्या दृष्टिकाेनातून आराेग्य विभागाचा आराखडा तयार केला असून, प्रशासनाने ताे कुंभमेळा प्राधिकरणाला सादर केला आहे. त्यात या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. कुंभमेळा प्रामुख्याने गाेदाकाठी भरणार असल्याने या ठिकाणी आराेग्य सुविधा देण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.
गाेदाकाठी चेंगराचेंगरी झाली किंवा नदीपात्रात काेणी बुडाला तर अशा व्य्नतीला तातडीचे उपचार मिळावेत यासाठी गाेदाकाठी दवाखान्यांबराेबरच ऑन साइट आयसीयू असणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विजय देवकर यांनी दिली.तपाेवन येथे शंभर खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. तपाेवनातील मुख्य गेटजवळ महापालिकेची वास्तू असून, तेथे यापूर्वीही कुंभमेळ्यात रुग्णालय तयार करण्यात आले हाेते. त्यानंतर आता पुन्हा या इमारतीवर एक मजला बांधण्यात येणार आहे. तेथेही आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर बांधण्यात येणार आहे. साधुग्रामच्या जागेतच हे रुग्णालय असल्याने तातडीने गाेल्डन अवरमध्ये उपचार करता येणार आहेत.पंचवटी कारंजावरील इंदिरा गांधी रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, येथे आणखी शंभर खाटा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. साधुग्राम आणि मिरवणूक मार्ग किंवा गाेदाघाटाजवळ हेच सर्वांत माेठे रुग्णालय असणार आहे.