ऊर्जा क्षेत्रात वेगाने बदल हाेत आहेत.भविष्यात अतिउच्चदाब केबलची मागणी वाढणार आहे. त्यासाठी विश्वसनीय व सुरक्षित केबलची निर्मिती करावी लागणार आहे. अधिकाऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करून नवआव्हानांसाठी तांत्रिकदृष्ट्या सज्ज राहावे, असे प्रतिपादन महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण यांनी केले.रामभाऊ म्हाळगी प्रबाेधिनीत अतिउच्चदाब केबल परिषदेत चव्हाण बाेलत हाेते. यावेळी राज्य भार प्रेषण केंद्र, ऐराेलीचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर, मुख्य अभियंता सुनील सूर्यवंशी, किशाेर गरुड, अनिल भारसाकळे, जयंत विके, प्रमाेद चिमणकर, महेश भागवत, जुईली वाघ, शिल्पा कुंभार, अधीक्षक अभियंता विशाल वाघचाैरे उपस्थित हाेते.ऊर्जा क्षेत्रात वेगाने बदल हाेत आहेत.काही ठिकाणी विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. स्मार्ट सिटीसारखे प्रकल्प हाेत आहेत.
त्यासाठी अतिउच्चदाब केबलची मागणी आहे. केबलमध्ये बिघाड झाला तर ताे दुरुस्त करायला खूप वेळ लागताे. ते आता परवडणारे नाही. केबलची गुणवत्ता चांगली ठेवून स्पेअर केबलची संकल्पना आता टाळायला हवी.त्यासाठी नवतंत्रज्ञानाचा उपयाेग वाढवला पाहिजे, असे चव्हाण यांनी सांगितले.केबलमधील बिघाड शाेधणे अतिशय जिकिरीचे असते. त्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करून भूमिगत हायब्रीड केबलचा वापर वाढवायला हवा. यासाठी केस स्टडी, बेस्ट प्रॅक्टिसेसचाही अभ्यास करायला हवा, असे जेवळीकर यांनी सांगितले.पहिल्या दिवशी आयआयटी मुंबईचे डाॅ. प्रशांत नवलकर, युनिव्हर्सल केबल, फिनाेलेक्स, रेकेम, टाटा पाॅवर; तसेच महापारेषणच्या अधिकाऱ्यांचे तांत्रिक सत्र झाले; तसेच विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले. या परिषदेत तंत्रज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले आहे.महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डाॅ. संजीव कुमार यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या.